पुणे : पुणे शहरातील आंबेगाव परिसरात रात्रीच्या वेळी दोघं मित्र एका गाडीत एकत्र बसून मद्यपान करत होते. अचानक आरोपी तेजस पवार याने आपली बेपत...
पुणे : पुणे शहरातील आंबेगाव परिसरात रात्रीच्या वेळी दोघं मित्र एका गाडीत एकत्र बसून मद्यपान करत होते. अचानक आरोपी तेजस पवार याने आपली बेपत्ता असलेली पत्नी आपल्याच मित्राच्या संपर्कात आहे आणि ती त्याच्याशी बोलते, या संशयातून त्याने मित्राच्याच डोक्यात थेट बिअरची बाटली फोडली आणि गंभीर जखमी केले.
याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप सुरेश घोडके (वय २५, रा. धनकवडी) यांनी याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून तेजस पवार (वय ४०, रा. आंबेगाव पठार) याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी तेजस आणि जखमी संदीप हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे असून दोघेही व्यवसायाने चालक म्हणून काम करतात. १४ मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कात्रज-देहूरोड बायपासवरील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिरासमोरील सेवा रस्त्यावर ही घटना घडली. दोघे मित्र एका गाडीत एकत्र बसून मद्यपान करत होते. अचानक आरोपी तेजस पवार याच्या डोक्यात संशयाचे भूत संचारले. तेजसची पत्नी काही दिवसांपासून बेपत्ता आहे. ती संदीपसोबत बोलते आणि ती कुठे आहे हे संदीपला माहित आहे, असा संशय तेजसला होता.
दरम्यान, याच विषयावरून दोघांमध्ये गाडीतच जोरदार वाद सुरू झाला. वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात तेजसने हातातील बिअरची भरलेली बाटली थेट संदीपच्या डोक्यात मारली. या भीषण हल्ल्यात संदीप घोडके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. भररस्त्यात गाडीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल जोग करत आहेत.


COMMENTS