छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील सरोरा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सासरच्या घरी 'घरजावई' म्हणून रा...
छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील सरोरा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सासरच्या घरी 'घरजावई' म्हणून राहणाऱ्या प्रकाश नावाच्या व्यक्तीने आपल्या मेहुण्याची निर्घृण हत्या केली आहे.
गिरधर साहू असे मृत मेहुण्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरधर हा प्रकाशला वारंवार घरजावई असल्यावरून टोमणे मारत असे. या अपमानास्पद वागणुकीमुळे प्रकाशच्या मनात तीव्र राग होता, ज्याचा शेवट बुधवारी (13 मे) एका रक्तरंजित संघर्षात झाला.
दारु पाजून संपवले
हत्या करण्यापूर्वी आरोपी प्रकाशने अत्यंत थंड डोक्याने कट रचला. तो गिरधरला सरोरा परिसरातील रिंग रोड क्रमांक-2 वरील एका मद्यविक्री केंद्रावर घेऊन गेला. तिथे त्याला भरपूर दारू पाजल्यानंतर तो पुन्हा सरोरा वळणाजवळ घेऊन गेला आणि तिथेही त्याला पुन्हा मद्यपान करवले. गिरधर पूर्णपणे नशेत धुंद झाल्याची खात्री पटताच, प्रकाशने चाकू आणि फणस कापण्याच्या धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की गिरधरचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांकडे आत्मसमर्पण
विशेष म्हणजे, मेहुण्याची हत्या केल्यानंतर आरोपी प्रकाशने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने स्वतः 'डायल 112' वर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि आपली लोकेशन सांगून आत्मसमर्पण केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपीला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. कौटुंबिक ताणतणाव, आर्थिक परावलंबित्व आणि दारूचे व्यसन ही या हिंसक कृत्यामागची प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
रायपूरमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ
रायपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झालेली वाढ आता चिंतेचा विषय बनली आहे. शहरात गेल्या चार महिन्यांत तब्बल 18 हत्या आणि 60 हून अधिक चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. कोतवाली सब-डिव्हिजन क्षेत्रात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली असून, पोलिसांनी येथून आतापर्यंत 110 हून अधिक आरोपींना अटक केली आहे. मात्र, या वाढत्या आकडेवारीमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरला आहे का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.


COMMENTS