सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बोरमणी गावाजवळ घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. या प...
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बोरमणी गावाजवळ घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याला पोलिसांनी पश्चिम बंगालमधून ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
२ मे रोजी घडलेल्या या भीषण घटनेनंतर आरोपी फरार होता.
सोलापूरच्या बोरमणी गावात २ मे रोजी संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याने कौटुंबिक वादातून आणि संपत्तीच्या हव्यासापोटी भावजय गायत्री मस्के, पुतणी प्रिया मस्के आणि पुतण्या शिवराज मस्के यांच्यावर तलवारीने सपासप वार केले होते. या हल्ल्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता.
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विविध पथके तैनात केली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे, आरोपी पश्चिम बंगालमध्ये लपून बसल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. बोरमणी तिहेरी हत्याकांड प्रकरणात केवळ शंकरच नव्हे, तर इतरही काहींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले होते. पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणाशी संबंधित ५ संशयित आरोपींना अटक केली आहे. आता मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के हाती लागल्याने या प्रकरणातील अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मस्के कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या आणि संपत्तीच्या वाटणीवरून वाद सुरू होता. तसेच मृत गायत्री यांनी आरोपीला दीराला २५ लाख रुपये उसणे दिले होते. मागील काही दिवसांपासून त्या आरोपीकडे पैशांची मागणी करत होत्या. तसेच त्यांचा दीड एक जमीनीचा वाद देखील सुरू होता. याच वादातून हे भीषण हत्याकांडात घडल्याची माहिती पुढे आली आहे. एकाच वेळी घरातील तिघांचा बळी गेल्याने बोरमणी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


COMMENTS