अहिल्यानगर: संगमनेरच्या राजेंद्र गडगे याने श्रद्धेच्या नावाखाली भोळ्या भक्तांकडून हजारो रुपयांची लूट करत झटक्यात कॅन्सर बरा करतो म्हणणाऱ्य...
अहिल्यानगर: संगमनेरच्या राजेंद्र गडगे याने श्रद्धेच्या नावाखाली भोळ्या भक्तांकडून हजारो रुपयांची लूट करत झटक्यात कॅन्सर बरा करतो म्हणणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे.
राजेंद्र गडगे हा मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करायचा.
त्याच्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक पवित्रा घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा, आयटी कायदा, ड्रग्ज अॅन्ड मॅजिक रेमेडी अॅक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट, बनावट व्हिडिओ बनवणे यासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत कारवाई केली. अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी फिर्याद दाखल केली.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील दत्तधाममध्ये एक तथाकथित महाराज मंत्रोच्चार करून शारीरिक आजार बरे करत असल्याचा दावा करत असल्याची माहिती समोर आली होती. स्वतःला गडगे महाराज म्हणून ओळख करून देणाऱ्या या व्यक्तीभोवती मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत होती. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. क्षणात आजार बरे होतात म्हणून लोकांची त्याच्याकडे मोठी गर्दी होत असे.
लोकांच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन तो अनेकांकडून ११ हजार, २१ हजार, ५२ हजार अशा रकमा घेऊन फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि अंनिसने त्याच्यावर कारवाईची मागणी केली. राजेंद्र गडगे याच्याबरोबरच त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, सुरज शिंदे, मधुकर शिंदे, डॉक्टर मोहन पुरी यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटकेची कारवाई केली.
संगमनेरमधील दत्तधाम सरकार नावाने गडगे महाराज याने साम्राज्य उभे केले. भोळ्या भक्तांना फसवून त्याने हजारो रुपये उकळले. कोणतेही मेडिकल सायन्स माहिती नसताना त्याने भक्तांना आजार बरा करण्याचे आश्वासन देऊन पैसे उकळण्यासाठी नाटक केले. या माध्यमातून त्याने लाखोंची संपत्ती जमा केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS