नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर आज (शुक्रवार) अपघातात मृत्यू झाला आहे. संभाजी नगरहून शिर...
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर आज (शुक्रवार) अपघातात मृत्यू झाला आहे. संभाजी नगरहून शिर्डीला जात असताना अपघात झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेळके आपल्या कुटुंबासह कारने प्रवास करत होते. धोत्रे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरचा अंदाज न आल्याने त्यांची कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला असून जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात जितेंद्र शेळके यांचा मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मुलाला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची पत्नी बराच वेळ कारमध्ये अडकलेली होती, त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू होते.
जितेंद्र शेळके हे गेल्या काही दिवसांपासून लैंगिक शोषण आणि अनेक बड्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना लुबाडल्याने चर्चेत आलेल्या अशोक खरातचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. खरात याच्या ‘शिवनिका ट्रस्ट’चे ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. याशिवाय, शेळके यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरात याची भागीदारी असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके मोठ्या मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, खरातचे कारनामे बाहेर येताच शिवनिका संस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष शिर्डीतील जितेंद्र शेळके आणि सुभाष गमे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हे राजीनामे थेट नाशिकच्या धर्मादाय आयुक्तांकडे पाठवण्यात आले होते.


COMMENTS