एका सरकारी शाळेतील शिक्षकाने आपल्या महिला सहकाऱ्याच्या मदतीने एका शिक्षिकेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी केवळ अत्याचार...
एका सरकारी शाळेतील शिक्षकाने आपल्या महिला सहकाऱ्याच्या मदतीने एका शिक्षिकेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळले.
याप्रकरणी पीडित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ही घटना आहे.
गुंगीचे औषध मिसळून बलात्कार
मिळालेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये पीडित शिक्षिकेची नियुक्ती उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये झाली होती. यानंतर दुर्दैवाने 2016मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे त्यांनी आपली बदली आग्रा याठिकाणी करुन घेतली. २०२२ मध्ये एका रजेचे मंजुरी पत्र घेण्यासाठी त्या सुजाता सोनी यांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी तिथे प्राथमिक विद्यालय सीतापूर येथे तैनात असलेला शिक्षक संजीव रावत आधीच उपस्थित होता. सुजाताने पीडितेच्या शीतपेयामध्ये गुंगीचे औषध मिसळले, त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत संजीव रावतने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे आक्षेपार्ह फोटो काढले.
आक्षेपार्ह फोटो काढून ब्लॅकमेल
या घटनेनंतर आठवडाभरातच सुजाताने ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेकडे एक लाख रुपयांची मागणी केली. बदनामीच्या भीतीने पीडितेने वेळोवेळी आरोपींना पैसे दिले, मात्र आरोपींची मागणी थांबली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला 9 आणि 10 मार्च रोजी संजीवने कारने पीडितेचा पाठलाग करून तिला पुन्हा धमकावले. इतकेच नाही तर आरोपीने पीडितेच्या कुटुंबीयांनाही ते आक्षेपार्ह फोटो पाठवले. यामुळे घाबरलेल्या पीडितेने अखेर आपल्या कुटुंबाला सर्व हकीकत सांगितली.
शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
कुटुंबीयांनी दिलेल्या धैर्यामुळे पीडित शिक्षिकेने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. पोलीस आयुक्त दीपक कुमार यांच्या सूचनेनंतर, न्यू आग्रा पोलीस ठाण्याचे प्रभारी योगेश कुमार यांनी आरोपी संजीव रावत आणि सुजाता सोनी यांच्याविरुद्ध बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींच्या टोळीमध्ये अन्य काही महिला देखील अडकल्या असण्याची शक्यता पीडितेने वर्तवली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


COMMENTS