नवरा आणि बायकोमधील किरकोळ वादाचे रुपांतर भीषण हत्येत झाले आहे. हा वाद होता फक्त माहेरी जाण्याचा. यावरुन झालेल्या वादात नवऱ्याने आपल्या बायको...
नवरा आणि बायकोमधील किरकोळ वादाचे रुपांतर भीषण हत्येत झाले आहे. हा वाद होता फक्त माहेरी जाण्याचा. यावरुन झालेल्या वादात नवऱ्याने आपल्या बायकोची निर्घृण हत्या केली. यामुळे एक हसतेखेळते कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाले.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोनू देवी असे मृत महिलेचे नाव असून झारखंडच्या बोकारो परिसरातील ही घटना आहे.
गाढ झोपेत असताना हत्या
सोनू देवी ही रविवारी (26 एप्रिल) सकाळी आपल्या 13 महिन्यांच्या चिमुकल्यासोबत घरात गाढ झोपली होती. याच दरम्यान, आरोपी पती विकास रजवार याने तिच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून तिची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, विकास हा तामिळनाडूमध्ये मजुरीचे काम करायचा आणि केवळ दहा दिवसांपूर्वीच तो गावी परतला होता. गावी आल्यानंतर माहेरी जाण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत होते.
माहेरी जाण्यावरुन वाद
घटनेच्या आदल्या रात्रीही माहेरी जाण्याच्या हट्टावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. हा राग मनात धरून रविवारी पहाटे, जेव्हा पत्नी गाढ झोपेत होती, तेव्हा विकासने अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. धक्कादायक बाब म्हणजे, या क्रूर कृत्यानंतर आरोपीने स्वतः आपल्या वडिलांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले.
आरोपी पती ताब्यात
पिंडराजोरा पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आरोपी पतीला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त केले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मात्र, या घटनेबाबत पोलिसांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर अधिकृत प्रतिक्रिया देण्याचे टाळले. एका लहान बाळाच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने गावात शोककळा पसरली आहे.


COMMENTS