भोपाळ (मध्य प्रदेश): धार जिल्ह्यात देवकृष्ण पुरोहित हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी पत्नी प्रियंका हिला अटक केली असू...
भोपाळ (मध्य प्रदेश): धार जिल्ह्यात देवकृष्ण पुरोहित हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी पत्नी प्रियंका हिला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
मृत देवकृष्णची बहीण ज्योती हिने प्रियंकाच्या क्रूर वागणुकीची माहिती दिली.
प्रियंका देवकृष्णला त्याच्या रंगावरून वारंवार हिणवायची. ‘तू काळा आहेस, तू मला डिझर्व्ह करत नाहीस. माझ्या लायकीचा एखादा देखणा मुलगा हवा होता. तू मला खुश ठेवू शकत नाहीस, मला घटस्फोट दे,’ असे म्हणून ती देवकृष्णचा मानसिक छळ करायची.
कुटुंबाने केलेल्या दाव्यानुसार, प्रियंकाचे २०२० पासून कमलेश नावाच्या युवकासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. ती सासरी असताना तिचा प्रेमी दर ३-४ दिवसांनी घराबाहेरून फेऱ्या मारायचा आणि प्रियंका तासनतास खिडकीत उभी राहून त्याला पाहत असे. मोबाईलवर तासनतास बोलणे आणि घरच्यांनी विरोध केल्यास भांडणे करणे हेच ती रोज करायची.
प्रियंका आणि कमलेशला एकत्र यायचे होते, पण देवकृष्ण त्यांच्यात अडथळा ठरत होता. अखेर कमलेशने आपला मित्र सुरेंद्र याला १ लाख रुपयांची सुपारी देऊन देवकृष्णची हत्या करण्यास सांगितले. घटनेच्या रात्री देवकृष्ण गाढ झोपेत असताना सुरेंद्रने घरात शिरून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रियंकाने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले आणि घरातील दागिने स्वतःच लपवून ठेवले, जेणेकरून हा दरोड्याचा प्रकार वाटेल. मात्र, सायबर सेल आणि फॉरेन्सिक टीमने तपास केला असता, घरात बाहेरून कोणीही जबरदस्तीने शिरल्याचे पुरावे मिळाले नाहीत. पोलिसी खाक्या दाखवताच प्रियंकाने गुन्ह्याची कबुली दिली.
देवकृष्ण आणि प्रियंका यांचा विवाह वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी झाला होता. सज्ञान झाल्यावर जेव्हा त्यांना एकत्र राहण्यास सांगण्यात आले, तेव्हापासून प्रियंकाने विरोध सुरू केला होता. ती ३ वर्षे माहेरी राहात होती, मात्र समाजाच्या दबावामुळे तिला सासरी पाठवण्यात आले होते. पण तिने घरातच मुलाला संपवण्याचा कट रचला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पत्नी प्रियंका आणि प्रेमी कमलेशला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येसाठी १ लाखाची सुपारी घेणारा सुरेंद्र अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


COMMENTS