पुणे: पुणे शहरात बुधवारी (ता. १५) रात्री आठच्या सुमारास अलंकार चौक परिसरात एका माथेफिरू प्रवाशाने प्रवाशांनी गच्च भरलेल्या पीएमपी बसमध्येच...
पुणे: पुणे शहरात बुधवारी (ता. १५) रात्री आठच्या सुमारास अलंकार चौक परिसरात एका माथेफिरू प्रवाशाने प्रवाशांनी गच्च भरलेल्या पीएमपी बसमध्येच महिला कंडक्टरवर चाकूने खुनी हल्ला केला. या हल्ल्यात महिला कंडक्टर गंभीर जखमी झाल्या आहेत.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
सुरेखा बळीराम भालेराव (वय ३८) या पीएमपीमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी त्या ‘मनपा ते एसआरए विमाननगर’ या बसमध्ये कर्तव्यावर होत्या. जुना बाजार चौकातून एक प्रवासी बसमध्ये चढला आणि त्याने येरवड्याचे तिकीट काढले होते. मद्यप्राशन केलेला हा आरोपी बसमधील इतर प्रवाशांना विनाकारण शिवीगाळ करू लागला. सुरुवातीला प्रवाशांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, मात्र त्याचा त्रास वाढतच गेला.
आरोपीने सुरेखा भालेराव यांच्या कामातही अडथळा निर्माण केला. बस अलंकार चौकात आली असता, महिला कंडक्टरने त्याला बसखाली उतरण्यास सांगितले. याच गोष्टीचा राग मनात धरून त्याने संतापजनक कृत्य केले. खाली उतरण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्याने जवळ असलेला चाकू काढून थेट सुरेखा भालेराव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर बसमध्ये मोठी पळापळ झाली आणि गर्दीचा फायदा घेऊन आरोपी पसार झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.


COMMENTS