अमरावती : अमरावतीच्या परतवाडामध्ये युवतींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणांमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोण जास्...
अमरावती : अमरावतीच्या परतवाडामध्ये युवतींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणांमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोण जास्त मुलींना पटवणार आणि मोहात पाडणार अशी पैज दोन आरोपींमध्ये लागली होती, अशी माहिती समोर आली आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि आरोपी उझेर खान यांच्यात ही पैज लागली होती अशी माहिती समोर आली आहे. यावेळी आरोपी अयान अहमद हा मुलींसोबत केलेल्या अश्लील कृत्याचे व्हिडिओ बनवून उझेर खानला पाठवत होता. पण, काही दिवसांनी या दोन मित्रांमध्ये पैशावरून वाद झाला आणि या पैशाच्या वादातूनच रागाच्या भरात उझेर खान याने अयान अहमदचे सर्व अश्लील व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे आणि तिथूनच हे परतवाडा मधील युवतींचे लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आले.
मुख्य आरोपी अयान अहमद याने अमरावती शहरातील आपल्या एका मित्राची रूम काही तासांसाठी भाड्याने घेऊन तिथे मुलींवर अत्याचार केल्याची कबुली दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड अयान अहमद तनवीर अहमद (वय १९, रा. परतवाडा) याच्या अटकेनंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. अयानने चौकशीवेळी पोलिसांना दिलेल्या कबुलीत सांगितले की, त्याने अमरावती येथील त्याच्या एका मित्राच्या भाड्याच्या खोलीवर घेऊन जाऊन दोन मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. या कामासाठी तो मित्र आरोपी अयानला काही तासांसाठी आपली रूम देत असे. पोलिसांनी या रूम देणाऱ्या मित्रालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पीडित मुली अद्याप समोर आल्या नसल्या तरी तांत्रिक पुराव्यांवरून या अत्याचाराची पुष्टी झाली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
परतवाडा प्रकरणामध्ये मुख्य आरोपी अयान अहमद याचे मित्र असलेले अजून चौघांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आता एकूण आठ आरोपींना परतवाडा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अजून काही जणांची पोलीसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोपींनी पीडित मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या प्रकरणी ४५ सदस्यीय विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.


COMMENTS