पुणे : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण परिसरात एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भावाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आह...
पुणे : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण परिसरात एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भावाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने या मुलीचा जबरदस्तीने बालविवाहही लावून दिला.
या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी चुलत भावासह सात जणांविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी नोव्हेंबर २०२५ मध्ये आरोपीच्या घरी त्याच्या गरोदर पत्नीची देखभाल करण्यासाठी आली होती. मात्र, भावाच्या नात्याला विसरून आरोपीने तिचा विश्वासघात केला. फोटो व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या अत्याचारातून पीडिता गरोदर राहिली. हे प्रकरण उघडकीस येईल या भीतीने आरोपीने डॉक्टरांना खोटी माहिती देऊन पीडितेचा गर्भपात घडवून आणला. शिवाय, प्रकरण कायमचे दाबण्यासाठी त्याने २७ जानेवारी २०१६ रोजी चाकणमधील एका रेस्टॉरंटमध्ये स्वतःच्या मेहुण्याशी पीडितेचा बेकायदेशीर बालविवाह लावून दिला.
पत्नी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही पती अविनाश गोडे याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि विरोध केल्यास तिला मारहाण करण्यात आली. अखेर या सगळ्याला कंटाळून पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. उत्तर चाकण पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपींसह सात जणांवर गुन्हा नोंदवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS