विजयपूर (कर्नाटक): मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही असे टोमणे नागठाण (ता. विजयपूर) गावातील लोक वारंवार मारत असल्यामुळे जन्मदात्या बापानेच आपल्य...
विजयपूर (कर्नाटक): मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही असे टोमणे नागठाण (ता. विजयपूर) गावातील लोक वारंवार मारत असल्यामुळे जन्मदात्या बापानेच आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कृष्णा नदीत बुडवून मारल्याची घटना तब्बल एक महिन्याने उघडकीस आली आहे.
या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
सिद्धार्थ मल्लिकार्जुन अरकेरी (वय सहा) असे नदीत बुडवून मारलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. कराडजवळ वडोली गावाजवळ कृष्णा नदीत बुडवून बापाने जीव घेतल्याची घटना 16 मार्च रोजी घडली आहे. गावातील लोक वारंवार तुझा मुलगा तुझ्या सारखा दिसत नाही म्हणून बोलत असल्याने मल्लिकार्जुन अस्वस्थ झाला होता.
मुलाला शाळेत घालून येतो म्हणून मल्लिकार्जुन घरातून मुलाला घेऊन बाहेर पडला आणि कराडजवळ वडोलीत नेऊन नदीत मुलाला बुडवून मारले. मुलाला सिंदगी गावातील शाळेत दाखल केले असून तो हॉस्टेलमध्ये राहत असल्याचे मल्लिकार्जुनने घरी आल्यावर सांगितले. एक एप्रिल रोजी सिद्धार्थचा वाढदिवस होता म्हणून पत्नी भाग्यश्रीने मुलाला घरी घेऊन या असा तगादा लावल्यावर मल्लिकार्जुन पळून गेला. त्यामुळे संशय आल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली.
पोलिसांच्या चौकशीत मल्लिकार्जुनने मुलाला कृष्णा नदीत बुडवून मारल्याची कबुली दिली. 16 मार्च रोजी कराडच्या मसूर पोलीस ठाण्यात लहान मुलाचा मृतदेह नदीत सापडल्याची नोंद झाली होती. त्याचे निवेदन पोलिसांनी जाहीर केले होते. हे निवेदन आणि मल्लिकार्जुन याच्या जबानीमुळे कृष्णा नदीत सापडलेला मृतदेह सिद्धार्थचा होता, हे पोलिस तपासात सिद्ध झाले. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS