मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये 12 एप्रिलच्या रात्री झालेल्या एका हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असून, उज्जैनमधील एका सर...
मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये 12 एप्रिलच्या रात्री झालेल्या एका हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असून, उज्जैनमधील एका सराईत गुन्हेगारासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही खळबळजनक हत्या अनैतिक संबंध आणि पूर्व वैमनस्यातून झाली आहे. पोलिसांनी घटनेत वापरलेली बाईक, देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसेही जप्त केली आहेत.
'त्या' रात्री काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 एप्रिलच्या रात्री राऊ पोलीस ठाण्याला माहिती मिळाली की, एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडली आहे. नंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या मृत व्यक्तीचे नाव नवीन पाटीदार असे आहे. सुरुवातीला मर्ग दाखल करून तपास सुरू करण्यात आला, परंतु घटनास्थळी रिकाम्या पुंगळ्या सापडल्याने आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही हत्येची घटना असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून विशेष पथक स्थापन केले.
100 हून अधिक सीसीटीव्ही तपासले
पोलीस पथकाने 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयास्पद विना क्रमांकाच्या मोटरसायकलची ओळख पटवली. खबऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी एका कॉलनीमध्ये घेराबंदी करून तीन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुकेश कुमावत (उज्जैन), अजय धोलपुरिया आणि श्रीराम बलाई (दोन्ही जिल्हा देवास) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी खुलासा केला की, मृताच्या पत्नीशी असलेले मुकेश कुमावतचे अनैतिक संबंध आणि जुन्या वादातून त्यांनी हत्येचा कट रचला होता. तपासात असेही समोर आले आहे की, या प्रकरणात राहुल उईके (रा. उज्जैन) हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बायकोचाही नवऱ्याच्या हत्येत सहभाग
तसेच मृताची पत्नी भारती हिचा देखील या कटात सहभाग असल्याचे आढळल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मुख्य आरोपी मुकेश कुमावत याच्यावर यापूर्वीच हत्या, हत्येचा प्रयत्न, अवैध शस्त्रे आणि मारामारी यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. इतर आरोपींचाही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून फरार आरोपीला लवकरच अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


COMMENTS