मुंबई : नाशिकमधील भोंदू ज्योतिषी कॅप्टन ऊर्फ अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांची नाशिक गुन्हे शाखेने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल ...
मुंबई : नाशिकमधील भोंदू ज्योतिषी कॅप्टन ऊर्फ अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांची नाशिक गुन्हे शाखेने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केली आहे.
या पथकाचे नेतृत्व IPS तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले असून त्यांनी आज (गुरुवार) अशोक खरात याची दोन ते तीन तास कसून चौकशी केली आहे.
अशोक खरात याला बुधवारी रात्री नाशिक पोलिसांनी अटक केली. खरातच्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याने किती महिलांवर अत्याचार केले आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणाची दखल खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेऊन पोलिस महासंचालकांना कारवाईचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या निर्देशानुसारच खरात याच्या चौकशी करीता नाशिक पोलिसांनी एसआयटीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.
एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अशोक खरात याची तब्बल दोन ते तीन तास कसून चौकशी केली. त्याच्याकडे असलेल्या पॅनड्राईव्हबाबतही त्यांनी विचारपूस केल्याचे कळते.
दरम्यान, तेजस्वी सातपुते यांची ओळख एक दबंग पोलिस अधिकारी आणि कार्यक्षम महिला पोलिस अधिकारी म्हणून आहे. तेजस्वी सातपुते या कठोर कार्यपद्धती आणि संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासासाठी प्रसिद्ध आहेत. २०१२च्या आयपीएस बॅचच्या त्या अधिकारी आहेत. त्या मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावच्या रहिवासी आहेत. त्यांनी आतापर्यंत सातारा पोलिस अधीक्षक, सोलापूर पोलिस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर पोलिस अधीक्षक म्हणून उत्तम प्रकारे जबाबदारी सांभाळली आहे. तसेच पुणे वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त म्हणूनही त्यांची कारकीर्द राहिली. एसआरपीएफच्या त्या समादेशकही राहिल्या. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठीही त्यांची शासनाने नियुक्ती केली होती.


COMMENTS