एका किरकोळ वादातून एका पत्नीने आपल्या पतीची डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. रमेश प्रजापती असे मृत पतीचे नाव...
एका किरकोळ वादातून एका पत्नीने आपल्या पतीची डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. रमेश प्रजापती असे मृत पतीचे नाव आहे. शुक्रवारी (20 मार्च) सकाळी रमेश कामावर न आल्याने त्याच्या सहकाऱ्याने घरी जाऊन चौकशी केली असता, बायकोने त्याला 'रमेशचे डोके दुखत आहे' असे सांगून टाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र, संशय आल्याने सहकाऱ्याने आत डोकावले असता रमेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याचा मृत्यू झाला. मध्यप्रदेशातील शाजापूरमधील हे प्रकरण आहे.
दोघेही दारुच्या नशेत
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या दांपत्याला मद्यपानाचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. आरती असे आरोपी महिलेचे नाव असून 19 मार्चच्या रात्री ती नवऱ्यासोबत दारु प्यायली होती. यावेळी दारूच्या नशेत असताना दोघांमध्ये जोरात भांडण झाले. या वादाचे रूपांतर हिंसेत झाले आणि रागाच्या भरात आरतीने जवळच असलेल्या पेव्हर ब्लॉकने रमेशचे डोके ठेचले. धक्कादायक बाब म्हणजे, पतीवर हल्ला केल्यानंतर आरती त्याला तशाच अवस्थेत सोडून तिथेच झोपली आणि सकाळी उठून नेहमीप्रमाणे कामावरही गेली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्तीची हालचाल न दिसल्याने पोलिसांचा संशय पत्नीवर बळावला.
रक्ताने माखलेला पेव्हर ब्लॉक सापडला
घटनेची माहिती मिळताच पोलिस फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याच्या ठिकाणी पोलिसांना रक्ताने माखलेला आणि केसांचे पुंजके असलेला पेव्हर ब्लॉक सापडला आहे, जो हत्येसाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये दारूवरून नेहमीच खटके उडत असत. पोलिसांनी सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून पत्नी आरतीला ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आरतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पती-पत्नीमधील कौटुंबिक कलहाने अशा प्रकारे रक्तरंजित वळण घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


COMMENTS