जावई आणि सासू यांचं नातं काहीसं गुंतागुंतीचं असल्याचं पहायला मिळतं. या नात्यातील गंमती-जमती सांगणारं बरचसं लेखन आपल्या वाचनात येत असतं. या...
जावई आणि सासू यांचं नातं काहीसं गुंतागुंतीचं असल्याचं पहायला मिळतं. या नात्यातील गंमती-जमती सांगणारं बरचसं लेखन आपल्या वाचनात येत असतं. यासोबतच काही गुन्हेदेखील घडत असतात.
गुन्ह्याविषयी अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जावयाने कात्रीने आपल्या सासूचे नाकच कापल्याचा प्रकार घडला आहे. पोलिस तपासात यामागे एक भयानक कारण असल्याचे समोर आले आहे. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातलं हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊया.
मुलीचा फोन बंद असल्याने आई-वडील चिंतेत
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी सरिता हिचे लग्न सुमारे चार वर्षांपूर्वी आरवा येथील रहिवासी सोहनलाल बिश्नोई याच्याशी झाले होते. सध्या सरिता जोधपूरमध्ये राहून शिक्षण घेत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सरिताचा फोन बंद असल्याने तिचे वडील बाबूलाल आणि आई केलीदेवी चिंतेत होते.
गाडी अडवून हल्ला
याप्रकरणी तक्रार देण्यासाठी बाबूलाल आणि त्यांची पत्नी सरवाना पोलीस ठाण्याकडे जात असताना, एका कारने त्यांची गाडी अडवली. त्या कारमध्ये सोहनलाल बिश्नोई आणि त्याचे इतर साथीदार होते. आरोप आहे की, या सर्वांनी केलीदेवी यांना जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवले आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान सोहनलालने कात्रीने आपली सासू केलीदेवी यांचे नाक कापले. एवढेच नाही तर त्याने नाकातील सोन्याचा दागिनाही हिसकावून घेतला आणि आपल्या साथीदारांसह घटनास्थळावरुन पळ काढला.
रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या केली देवी यांना तातडीने उपचारासाठी गुजरातच्या मेहसाणा येथील रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच सरवाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी जावई सोहनलाल विश्नोई याच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
हल्ल्यामागे नेमकं कारण काय?
प्राथमिक माहितीनुसार, मुलगी सरिता गेल्या अनेक दिवसांपासून सासरी जात नव्हती. तसेच, तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी लावून दिले जात असल्याची कुणकुण नवऱ्याला आणि तिच्या सासरच्या मंडळींना लागली होती. याच कारणावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद वाढला होता आणि त्यातूनच जावयाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.


COMMENTS