पुण्यातील कात्रज परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरून जुळलेल्या प्रेमसंबंधानंतर विवाह झालेल्या तरुणाने कथित छळाला कंट...
पुण्यातील कात्रज परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरून जुळलेल्या प्रेमसंबंधानंतर विवाह झालेल्या तरुणाने कथित छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी पत्नी सहित पाच जणांना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव मोहम्मद साद (साद) आसीफ सय्यद (वय 20) असे आहे. या घटनेबाबत त्याचे वडील नौशा दत्तन्वीर अहमद (रा. मालेगाव, जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद साद याची ओळख करीमुन्निशा ऊर्फ निशा खान (वय 20, रा. जांभुळवाडी) हिच्याशी सोशल मीडियावर झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले आणि गेल्या वर्षी दोघांनी विवाह केला. त्यानंतर मोहम्मद पुण्यात येऊन रिक्षा चालवून उपजीविका करत होता. मात्र, विवाहानंतर पत्नी आणि तिच्या माहेरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून मोहम्मद साद याने 12 मार्च रोजी पहाटे साडे दोनच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगर परिसरात रिक्षामध्येच विषारी औषध प्राशन केले.
घटनेनंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस उपचार सुरू असतानाच 18 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पत्नी करीमुन्निशा खान, सर्वर ऊर्फ कैफ कमरुखान, रेश्मा कमरुखान, शमा जावेद शेख आणि जावेद शेख यांचा समावेश आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.


COMMENTS