नाशिक: तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या अटकेदरम्यान घडलेला थरार आता उघड झाला असून, नाशिक पोलिसांनाही त्याच्य...
नाशिक: तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या अटकेदरम्यान घडलेला थरार आता उघड झाला असून, नाशिक पोलिसांनाही त्याच्या विचित्र प्रतिक्रिया आणि पोकळ धमक्यांचा सामना करावा लागल्याचे समोर आले आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे गुप्त कारवाई करत खरातला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमध्ये सुरुवातीला 58, तर पुढे तब्बल 100 व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
अटकेच्या वेळी पोलिसांनी 'प्रसाद' (म्हणजेच पोलिसी खाक्या) दाखवताच खरातने आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. "तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल," अशा शब्दांत त्याने पोलिसांना धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला कडक शब्दांत समज देत परिस्थिती नियंत्रणात आणली. तरीही काही काळ तो संतापाच्या भरात थयथयाट करत राहिला.
अशोक खरात याच्या अटकेदरम्यान नाशिक पोलिसांनी संपूर्ण कारवाई अत्यंत गुप्ततेत पार पडली. तब्बल पाच पथके तयार करण्यात आली होती, मात्र या पथकांतील अनेक कर्मचाऱ्यांना नेमकी कोणती कारवाई करायची आहे किंवा कोणाला अटक करायची आहे, याची माहिती शेवटपर्यंत देण्यात आली नव्हती. कायद्याचा प्रश्न निर्माण झाल्याच्या नावाखाली पोलिसांना लाठ्या, हेल्मेट आणि शिल्डसह सज्ज ठेवण्यात आले. FIR नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यांनाही अटकेच्या कारवाईपासून दूर ठेवण्यात आले होते. ऐनवेळी घटनास्थळी पोहोचल्यानंतर 'घरात चोर शिरल्याचा' बनाव रचत पोलिसांनी अचानक धाड टाकली आणि खरातला ताब्यात घेत 'ऑपरेशन कॅप्टन खरात' यशस्वीरीत्या पूर्ण केले. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी दाखवलेली रणनीती आणि गुप्तता यामुळे अटकेचा थरार अधिकच वाढला आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंच्या आधारे तपासाचा वेग वाढला असून, या प्रकरणातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


COMMENTS