पुणे शहरात एका अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटनेने खळबळ उडवली आहे. अवघ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने घरामध्येच बाळाला जन्म दिला असून, प्र...
पुणे शहरात एका अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटनेने खळबळ उडवली आहे. अवघ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने घरामध्येच बाळाला जन्म दिला असून, प्रसूतीनंतर स्वतःच बाळाची नाळ कापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सध्या संबंधित मुलगी आणि नवजात बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुलीच्या मोठ्या बहिणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यावरून पोलिसांनी आदिल फारुख शेख (वय 24, रा. गोल्ड सिटी बिल्डिंग, न्यू नाना पेठ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मार्च 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत घडल्याचे तपासात समोर आले आहे.
फरशीवर व दरवाज्याजवळ रक्ताचे डाग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा विवाह झालेला असून त्या 31 जानेवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास माहेरी आल्या होत्या. त्या वेळी घर आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळाने भाऊ आल्यानंतर आवाज दिल्यावर लहान बहिणीने दरवाजा उघडला. घरात प्रवेश केल्यानंतर फरशीवर व दरवाज्याजवळ रक्ताचे डाग दिसून आले. तसेच खिडकीजवळ एक नवजात बाळ ठेवलेले आढळले.
आदिल शेख याच्यासोबत प्रेमसंबंध
कुटुंबीयांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने घरातच प्रसूती झाल्याचे सांगितले. बाळाची नाळ कोणी कापली, असा प्रश्न विचारल्यावर तिने स्वतःच नाळ कापल्याची कबुली दिली. त्यानंतर आई व आत्या घरी आल्यावर चौकशी केली असता, गेल्या वर्षभरापासून आदिल शेख याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे आणि त्यातून अनेकदा शारीरिक संबंध झाल्याचे तिने सांगितले.
वैद्यकीय उपचार सुरु
या घटनेनंतर तातडीने मुलगी आणि नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांवरही वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास समर्थ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक निकिता उईके करत आहेत.


COMMENTS