बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या कारागृहात असून, सर्वोच्च न...
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या कारागृहात असून, सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
वाल्मिक कराड सातत्याने जामीनासाठी प्रयत्न करत आहे. प्रथम सत्र न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्याला दिलासा मिळालेला नाही. न्यायालयीन पातळीवर अपयश आल्याने कराड कुटुंबाची अडचण वाढली असतानाच आता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने केलेल्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.
आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार…अशा आशयाची पोस्ट सुशील कराड याने सोशल मीडियावर टाकली आहे. या पोस्टमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असून संपूर्ण प्रकरणाबाबत नवे खुलासे होणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः संतोष देशमुख हत्या प्रकरण किंवा महादेव मुंडे प्रकरण, यापैकी नेमक्या कोणत्या गुन्ह्याबाबत सुशील कराड काय बोलणार याबाबत सध्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वाल्मिक कराडवर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असून तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. न्यायालयाने जामीन नाकारताना गुन्ह्याचे गांभीर्य, तपासाची दिशा आणि पुराव्यांची शक्यता लक्षात घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आरोपीस तात्पुरता दिलासा देणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाचे मत आहे. दरम्यान, सुशील कराडच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. आता वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. विशेष म्हणजे वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आज त्याच्या मुलाने फेसबुक पोस्ट केली आहे.


COMMENTS