जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले शिवनेरी येथे मध्यरात्री मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. शिवजयंतीच्या निमि...
जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले शिवनेरी येथे मध्यरात्री मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवभक्तांनी शिवनेरी किल्ल्यावर मोठी गर्दी केली आहे.
या घटनेत काही शिवभक्त जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंबरखाना परिसरात असणारा हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजाच्या दरम्यान असलेल्या अरुंद दरवाज्यात प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. मध्यरात्रीच्या सुमारास शिवनेरीवर दर्शनासाठी आणि ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी आलेल्या शिवभक्तांची संख्या मोठी होती. अरुंद प्रवेशमार्गामुळे लोकांचा ओघ वाढत गेला आणि पुढे जाण्यासाठी एकच मार्ग उपलब्ध असल्याने ढकलाढकली सुरू झाली.
गर्दी नियंत्रणासाठी त्या ठिकाणी पोलिस प्रशासन किंवा स्थानिक प्रशासन तात्काळ उपस्थित नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास उशीर झाल्याचे सांगितले जात आहे. काही वेळातच ढकलाढकलीचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले आणि काही शिवभक्तांना दुखापत झाली.
जखमी झालेल्या शिवभक्तांना तातडीने उपचारासाठी जुन्नर आणि मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे. जखमींची अचूक संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. घटनेनंतर परिसरात परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून, पुढील अनिष्ट प्रकार टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचे सांगितले जात आहे. अधिकृत अहवालानंतरच संपूर्ण घटनेचा तपशील स्पष्ट होणार आहे.


COMMENTS