अहिल्यानगर: एकतर्फी प्रेमातून तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील तपनेश्वर भागात घडली आह...
अहिल्यानगर: एकतर्फी प्रेमातून तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील तपनेश्वर भागात घडली आहे. या हल्ल्यात नृत्यांगना गायत्री गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जामखेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री (वय 26, व्यवसाय-नृत्यांगना, मूळ रा. वाघोली, जि. पुणे, सध्या रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, जि. अहिल्यानगर) ही तिची मैत्रीण मनिषा हिच्यासोबत वास्तव्यास आहे. गायत्री नृत्यांगनेचे काम करून आपली उपजीविका करते. फिर्यादी गायत्री हिची आरोपी राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याच्याशी मागील पाच वर्षांपासून ओळख होती. मात्र, 2024 पासून दोघांमधील संबंध तुटले होते. यापूर्वीही फिर्यादी महिलेने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती.
गुरुवारी (ता. ५) रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आरोपी राहुल कचरे याने फिर्यादी महिलेला फोन करून, "तू माझ्याशी बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. जर तू बोलली नाहीस, तर तुला मारून टाकीन," अशी धमकी दिली होती. यानंतर फिर्यादीने त्याचा फोन कट केला. यानंतर शुक्रवारी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास, गायत्री तिच्या खोलीत मैत्रीण मनिषा हिच्यासोबत असताना मनिषा बाल्कनीत गेली. त्याच वेळी आरोपी राहुल कचरे हा इमारतीजवळ दबा धरून बसलेला होता. आरोपीने हातात कोयता घेऊन थेट फिर्यादीच्या खोलीत घुसून, "तू माझ्याशी का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केला?" असे म्हणत गायत्रीच्या बोटांवर, हातावर आणि डोक्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली.
यावेळी मैत्रीण मनिषा हिने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न करत "मारू नको" अशी विनंती केली. मात्र आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत "मी तुला संपवून टाकणार आहे," अशी धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी गायत्री हिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल अशोक कचरे याच्याविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


COMMENTS