सातारा: भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा सुट्टीवर आलेले असताना रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ते प...
सातारा: भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा सुट्टीवर आलेले असताना रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ते पत्नीच्या डिलिव्हरीसाठी गावी आले होते. एकीकडे त्यांची पत्नी बाळाला जन्म देत असताना दुसरीकडे प्रमोद जाधव यांचा मृत्यू झाला.
काळीज पिळवटून टाकणारा हा प्रसंग पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. ज्या लेकीच्या जन्माच्या आनंदासाठी ते गावी आले होते, त्याच लेकीला आपल्या वडिलांचे अंतिम दर्शन घेण्याची वेळ आली. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्हा सुन्न झाला आहे.
सातारा तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र प्रमोद परशुराम जाधव हे भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद (श्रीनगर) येथे कार्यरत होते. प्रमोद यांना आई नाही. काही वर्षे आधी आईचे निधन झाले होते. त्यामुळे पत्नीच्या प्रसूतीच्या काळात सोबत राहण्यासाठी ते आठ दिवसांपूर्वी सुट्टी घेऊन गावी आले होते. शनिवारी काही कामानिमित्त ते आपल्या दुचाकीवरून वाढे फाट्याकडे जात होते. यावेळी पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ एका आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, प्रमोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
प्रमोद जाधव यांच्या अपघाताची बातमी समजताच दरे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. हृदयद्रावक बाब म्हणजे, शनिवारी सकाळी जेव्हा प्रमोद यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणले जात होते, त्याच सुमारास त्यांच्या पत्नीने चिमुकलीला जन्म दिला. काही तासांपूर्वीच जन्मलेल्या चिमुकलीला जग बघायच्या आधीच पित्याचं छत्र हरवलं. अंत्यदर्शनावेळी तिला आपल्या वडिलांच्या जवळ नेण्यात आले होते.
जवान प्रमोद जाधव यांच्यावर शनिवारी दुपारच्या सुमारास दरे गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रमोद जाधव यांची पत्नी आणि काही तासांपूर्वीच जन्मलेली चिमुकली मुलगी पित्याच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आली. नवजात बालिकेने घेतलेले वडिलांचे अखेरचे दर्शन पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, अनेकांना अश्रू अनावर झाले. शासकीय इतमामात वीर जवान प्रमोद जाधव यांना मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रमोद जाधव यांच्या पश्चात त्यांचे वडील, पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे.


COMMENTS