नाशिक: कर्नाटकातील चोरली घाट परिसरात तब्बल 400 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संशयातून ...
नाशिक: कर्नाटकातील चोरली घाट परिसरात तब्बल 400 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संशयातून नाशिकमधील संदीप पाटील या युवकाचे अपहरण करून त्याला मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील रहिवासी संदीप पाटील यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, कर्नाटकातील चोरली घाटात 400 कोटी रुपयांचा रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या आरोपाच्या आधारे त्यांचे अपहरण करून अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. अपहरणादरम्यान आपल्याला बेदम मारहाण करण्यात आली, तसेच स्वतःसह कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात काही व्यावसायिकांसह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी तक्रारीत केला आहे. सदर रक्कम मुंबई-ठाणे परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाची असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे (मुंबई), विराट गांधी यांना अटक केली आहे. अद्याप दोन आरोपी फरार आहेत. प्रकरणाचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याने निष्पक्ष आणि स्वतंत्र तपासासाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी दिली आहे.
तक्रारीनुसार, गोवा राज्यातून कर्नाटकातील एका देवस्थानासाठी नेण्यात येत असलेल्या जुन्या दोन हजार रुपयांच्या नोटांनी भरलेल्या कंटेनरमध्ये सुमारे 400 कोटी रुपयांची रोकड होती, असा बनाव रचून ही रक्कम लंपास केल्याचा संशय आहे. ही घटना सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात पोलिस परस्पर समन्वयातून करत असून, प्रकरणात राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, तपासादरम्यान आणखी मोठी नावे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


COMMENTS