मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (बुधवार) सकाळी बारामती जवळ विमान अपघातात निधन झाले. विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह ...
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (बुधवार) सकाळी बारामती जवळ विमान अपघातात निधन झाले. विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी आणि दोन पायलटचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेत मृ्त्यूमुखी पडलेले विदीप जाधव हे मूळचे साताऱ्याचे होते. मात्र कर्तव्यानिमित्त ते सध्या मुंबईतील कळवा परिसरात राहात होते. या दुर्घटनेच्या बातमीनंतर अजित पवार यांच्यासमवेतचे त्यांचे विमानातील फोटो व्हायरल झाले आहेत.
अजित पवार यांच्या समवेत विमान दुर्घटनेत त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. या अपघाताचे वृत्त समजताच विदीप जाधव यांचे कुटुंबीय सकाळीच बारामतीकडे गेले. चाळीत राहणाऱ्या अनेकांनी आज सकाळी विदिप यांना कामावर जाताना बघितले होते, ज्यावेळी टीव्हीवर बातमी आली त्याचवेळी त्यांच्या आईने घरी रडायला सुरुवात केली, त्यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना समजवले. मात्र, थोड्याच वेळात कळवा पोलीस घरी आले आणि त्यांच्या आई आणि मुलाला बारामतीला घेऊन गेले, त्यांची पत्नी कालच पनवेल इथे माहेरी गेली होती. विदिप यांना एक मुलगा एक मुलगी, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. पोलिसात असून देखील त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ आणि मदतीचा होता, त्यांच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले विदीप जाधव हे 2009 च्या बॅचचे कॉन्स्टेबल होते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना या दुर्दैवी विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. विदीप जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील लोणंद गावचे रहिवासी. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ते परिचित होते. विमान दुर्घटनेतील त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि सहकाऱ्यांवर मोठा आघात झाला आहे.


COMMENTS