पणजी (गोवा): गोव्यामध्ये दोन रशियन महिलांच्या निर्घृण हत्येनंतर एकच खळबळ उडाली. संशयित रशियन किलर आलेक्सेई लिओनोव याला पोलिसांनी ताब्यात घ...
पणजी (गोवा): गोव्यामध्ये दोन रशियन महिलांच्या निर्घृण हत्येनंतर एकच खळबळ उडाली. संशयित रशियन किलर आलेक्सेई लिओनोव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान त्याने १५ महिलांची हत्या केल्याचा दावा केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
गोव्यात दोन रशियन महिलांच्या हत्येनंतर किनारपट्टीवरील राज्यातील पोलिस आरोपींनी इतरांचीही हत्या केली आहे का याचा शोध घेत आहेत. तर खून करणारा आरोपी आलेक्सेई हा पैशांसाठी रशियन महिलांशी मैत्री करायचा. पुढे प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्या दुसऱ्यांच्या संपर्कात गेला की त्यांना खून करायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो विशेषतः रशियन महिलांना लक्ष्य करत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
रशियन किलर आलेक्सेई याने आतापर्यंत १५ खून केल्याचा दावा केल्याने तपास यंत्रणा हादरून गेली आहे. कोठडीत चौकशीदरम्यान संशयिताकडून वारंवार विधाने बदलली जात असल्याने या प्रकरणाची गुंतागुंत अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने तपासाची दिशा ठरवत किनारी भागात झाडाझडती मोहीम सुरू केली आहे. रशियन नागरिक वास्तव्यास असलेल्या खोल्यांची तपासणी करण्यात येत असून, आलेक्सेई नेमका कुठे वास्तव्यास होता, याचाही शोध घेतला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी दिवसरात्र विविध भागांत तपास मोहीम राबवली आहे.
पेडणे तालुक्यातील बामनभाटी-हरमल येथे एलिना (वय ३५) या महिलेचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर काही तासांतच मोरजी येथे आणखी एका खुनाने खळबळ उडाली. मोरजी येथील एका घराच्या बाथरूममध्ये रशियन महिला एलिना वानिवा (वय ३७) हिचा नग्न अवस्थेत गळा चिरून खून झाल्याचे आढळून आले. या दोन्ही घटनांमुळे उत्तर गोव्यात एकच खळबळ माजली आहे. मांद्रे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आलेक्सेई याला शिताफीने ताब्यात घेतले. गोवा आणि हिमाचल प्रदेशात मिळून तब्बल १५ महिलांचे खून केल्याचा धक्कादायक दावा त्याने केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


COMMENTS