नांदेड : किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड परिसरातील एका महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडिला...
नांदेड : किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड परिसरातील एका महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडिलांची तीव्र ओढ आणि मानसिक अस्वस्थता यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
रानोजी विलास ऐनवलेवाड (वय 20) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो नांदेड येथे बी. एस्सी. प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. रानोजीचे आई-वडील रोजगारासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. काही दिवसांपूर्वी कामानिमित्त तो गावी आला होता. बुधवारी सकाळी रानोजीने आपल्या भावाला नांदेडला परत जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार भावाने त्याला इस्लापूर येथे सोडले. मात्र, तो नांदेडला न जाता पुन्हा सहस्त्रकुंड परिसरात परतला. त्यानंतर दुपारच्या सुमारास सहस्त्रकुंड येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास लावून त्याने जगाचा निरोप घेतला.
रानोजी याने आत्महत्येपूर्वी इंस्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने आई-वडिलांची आठवण व्यक्त करताना लिहिले होते, "आई, बाबा आज तुमची खूप आठवण येत आहे. मी घरी आहे, पण तुम्ही इथे नाही. लवकर या… मी वाट बघतोय." ही पोस्ट केल्यानंतर सुमारे दोन तासांतच त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला आला आहे. रानोजीने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून, तो मानसिक तणावात होता का, याचा पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


COMMENTS