मुंबई: फेसबुकवर मैत्री झालेल्या एका महिलेने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलदरम्यान उद्योजकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून तब्बल १ लाख २० हजार रुपये ...
मुंबई: फेसबुकवर मैत्री झालेल्या एका महिलेने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलदरम्यान उद्योजकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून तब्बल १ लाख २० हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरात घडली आहे.
या प्रकरणी उद्योजकाने अखेर बांगूरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील एका व्यावसायिकाची (वय ५०) फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी मैत्री झाली होती. व्यावसायिकाने त्या महिलेला आपला मोबाइल क्रमांक दिला. त्यानंतर त्या महिलेने व्यावसायिकाला व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल केला. या कॉलदरम्यान ती महिला अचानक कपडे काढताना दिसताच व्यावसायिकाने तातडीने तो कॉल बंद केला.
महिलेने या घटनेच्या काही दिवसांनंतर त्यांच्या संभाषणाचे स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवून क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर विविध मोबाइल क्रमांकावरून व्यावसायिकाला धमक्या द्यायला सुरुवात झाली. या धमक्यांमध्ये एका महिलेने तर स्वतःला दिल्ली पोलिसांमधील अधिकारी असल्याचे भासवत पैशांची मागणी केली. आपली बदनामी होईल या भीतीमुळे उद्योजकाने सुरुवातीला सुमारे १५ हजार रुपये दिले.
पहिल्या मागणीनंतर पुढील काही आठवड्यांमध्ये ब्लॅकमेल करणाऱ्यांनी सतत धमक्या देऊन त्याच्याकडून एकूण १ लाख २० हजार रुपये उकळले. इतके पैसे देऊनही पैशांची मागणी थांबत नसल्याचे आणि धमक्या सुरूच असल्याचे लक्षात आल्यावर, आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले. अखेर उद्योजकाने बांगूरनगर पोलिस ठाण्यात सायबर फसवणूक आणि खंडणीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस आता विविध क्रमांकांवरून धमक्या देणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.


COMMENTS