लातूर : एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा हकनाक बळी घेतल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आह...
लातूर : एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा हकनाक बळी घेतल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावत सत्य उलगडले आहे.
‘कानून के हात लंबे होते है’ हा डॉयलॉग चित्रपटात ऐकला असेल. पण, याचा प्रत्यय लातूरमध्ये आला आहे.
लातूरमधील औसा तालुक्यात वानवडा येथो शनिवारी रात्रीच्या सुमारास कार जळीत हत्याकांड घडलं. आरोपीचे नाव हे गणेश चव्हाण असे तर गोविंद किसन यादव (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या गोविंद यादव यांचा गणेश चव्हाण याने बळी घेतला आहे.
गोविंद यादव हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात राहणारे एक शेतकरी होते. लामजनी पाटी येथून ते आपल्या घराकडे जात असताना त्यांनी दारू प्यायली होती. गणेश चव्हाण याने गोविंद यांना पाहिलं आणि त्याच्या डोक्यात प्लॅन शिजला. गणेश चव्हाण याने गोविंद यादव यांच्याशी गोड गोड बोलून आपल्या कारमध्ये बसवले. पुढे जाऊन एका धाब्यावर त्याने कार थांबवली. तिथे गणेश याने गोविंद यांना परत दारू पाजली. स्वत: ही दारू प्यायला. गणेश चव्हाण याने मुद्दाम गोविंद यांना जास्त प्रमाणात दारू पाजली. दोघांनी चिकन थाळी खाल्ली. दारू जास्त झाल्यामुळे गोविंद हे शुद्धीवर नव्हते. शुद्धीवर नसलेल्या गोविंद यांना कारमध्ये समोरच्या सीटवर बसवले आणि औसा तालुक्यात वानवडा पाटी ते वानवडा रोडवर या निर्जनस्थळी घेऊन गेला.
दारू जास्त झाल्यामुळे गोविंद यादव हे झोपी गेले होते. गणेश चव्हाण याने कारमध्ये असलेल्या माचिसमधील काड्या गोविंद यांच्या आजूबाजूला टाकल्या. गोविंद यादव यांना जर जाग आली आणि पळण्याचा प्रयत्न केला तर म्हणून सीट बेल्ट तर लावला, सोबतच एक कपड्यानेही बांधून ठेवले. शिवाय, कारचा स्फोट झाला पाहिजे, असे लक्षात ठेवून गणेश याने कारच्या पेट्रोलच्या टाकीचे झाकण हे उघडे ठेवले.
गणेश बाहेर आला आणि त्याने कारला आग लावून दिली. कारने आगीचं रौद्ररुप धारण केले. आग लागल्यामुळे कारमध्ये असलेल्या गोविंद यादव यांना जाग आली, त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण, सीट बेल्ट लावलेला होता आणि दारही बंद होते. त्यांनी जीव वाचवण्यासाठी कारचा हॉर्न वाजवला. पण, निर्जनस्थळ असल्यामुळे कोणी मदतीला येऊ शकले नाही. बघता बघत कार आगीच्या भक्षस्थानी सापडली आणि गोविंद यांचा कारमध्ये जळून कोळसा झाला. गोविंद यांचा मृत्यू होईपर्यंत गणेश हा तिथेच उभा होता.
गणेश चव्हाण याने नंतर घटनास्थळावरून पळ काढला. खासगी बसने त्याने आधी कोल्हापूर आणि पुढे तो एसटीने विजयदुर्गमध्ये जाऊन पोहोचला. पण तिथे गेल्यावर तो आपल्याकडे असलेल्या आणखी एका फोनवरून आपल्या मैत्रिणींना मेसेज करत होता. पोलिसांनी लातूरमध्ये जेव्हा गणेश चव्हाण कोण आहे, याचा तपास सुरू केला तेव्हा त्याच्या एका मैत्रिणीजवळ पोलिस पोहोचले. घटना घडली होती १२ च्या सुमारास पण त्यानंतरही गणेश हा मैत्रिणीला मेसेज करत होता. मेसेज, चॅट सुरू होते. त्यामुळे पोलिसांना संशय बळावला आणि त्यांनी तपास सुरू केला आणि विजयदुर्गमधून गणेशला ताब्यात घेतले.
औसा पोलिस स्टेशनमध्ये गणेश चव्हाण याच्यावर गोविंद यादव यांचा खून केल्या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गणेश सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS