पुणे: कुख्यात गुंड गजा मारणे याला अटक करून सांगली कारागृहात नेत असताना 'व्हीआयपी ट्रिटमेंट' देणं पुणे पोलिस दलातील पाच पोलिस कर्मचाऱ...
पुणे: कुख्यात गुंड गजा मारणे याला अटक करून सांगली कारागृहात नेत असताना 'व्हीआयपी ट्रिटमेंट' देणं पुणे पोलिस दलातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांच्या महागात पडले आहे. हलगर्जीपणामुळे एका सहायक पोलिस फौजदारासह चार पोलिस कर्मचाऱ्यांवर दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी गुंड गजा मारणे याला काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. अटक केल्यानंतर त्याला सांगली कारागृहात हलवण्यात येत होते. यासाठी पुणे पोलिसांचे एक पथक शासकीय वाहनातून रवाना झाले होते. सांगलीला जात असताना पोलिसांची ही शासकीय गाडी साताऱ्यातील कणसे ढाब्यावर थांबली. गाडीतील पोलिस कर्मचारी जेवण करण्यासाठी खाली उतरले. यावेळी मारणे टोळीच्या साथीदारांनी पोलिसांच्या गाडीत घुसून गुंड गजा मारणे याची भेट घेतली. एका अनोळखी व्यक्तीने ढाब्यावरील जेवण (बिर्याणी) पोलिसांच्या गाडीत नेऊन मारणे याला दिले. विशेष म्हणजे, या ठिकाणी मारणेच्या ओळखीचे अनेक लोक जमले होते, तरीही पोलिसांनी त्यांना भेटण्यास मज्जाव केला नाही.
पोलिसांनी गुंडाला दिलेल्या या विशेष वागणुकीमुळे आणि कर्तव्यात कसूर केल्यामुळे, या कर्मचाऱ्यांवर तातडीने चौकशी करण्यात आली. तपासानंतर, संबंधित पोलिसांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. यानंतर पुणे पोलिस दलातील एका सहाय्यक पोलिस फौजदार आणि चार कर्मचाऱ्यांवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे त्यांना पुढील दोन वर्षे वेतनवाढ मिळणार नाही. पोलिस प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली आहे.


COMMENTS