अहिल्यानगर : जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणाऱ्या कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली पाटील हिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्य...
अहिल्यानगर : जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणाऱ्या कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली पाटील हिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दीपाली पाटील (वय ३५) ही मूळची कल्याण येथील रहिवाशी आहे. आपल्या काही मैत्रिणींसोबत ती सध्या जामखेडमधील तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडली. परंतु अनेक तास उलटूनही परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. तसेच, दिपाली ज्या रिक्षाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता, त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचे सांगितले. त्यामुळे, मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या असता रुम आतून लॉक होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलवला आहे. याबाबत, आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन प्रश्न उपस्थित केले आहेत.
दिपालीची मैत्रिण हर्षदा कामठे हिने दिलेल्या माहितीवरुन जामखेड पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दिपाली पाटील आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत कोण होते? त्या व्यक्तीचे संबंध कोणाशी आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा पाठिंबा आहे? त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याचे तपशील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन शोधावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, दीपाली पाटील हिला संदीप गायकवाड हा लग्नाचा तगादा लावत असल्यानेच तिने आत्महत्या केल्याचा तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे. संदीप गायकवाड हा भाजपशी निगडीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत पोलिस तपासात सत्य समोर येणार आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, ‘जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलं नाही. अशातच जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटील (35) यांनी एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी. यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.’


COMMENTS