महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य करत उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबो...
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य करत उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून "माणिक मोती गळाले" असा टोमणा मारत राऊतांनी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांवर टीकेची झोड उठवली.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य करत उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून "माणिक मोती गळाले" असा टोमणा मारत राऊतांनी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांवर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टप्प्याटप्प्याने 'गेम' करतील, असा सूचक इशारा देत महायुतीतील घटक पक्षांना सावध राहण्याचा संदेश त्यांनी दिला. पुढील काळात शिंदे गटाचा पक्ष अस्तित्वात राहील का, असा सवाल उपस्थित करत शेवटचा घाव हा "मिंध्यांवरच" घातला जाईल, असा घणाघाती टोला संजय राऊत यांनी लगावला.
धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेल्या भेटीवरही राऊतांनी भाष्य करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वाल्मिक कराड अद्याप तुरुंगात असून खटला संपलेला नसताना, गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींना मंत्रिमंडळात पुन्हा घेण्याचं पाप देवेंद्र फडणवीस करतील असं वाटत नाही, असं ते म्हणाले. मात्र फडणवीस मंत्रिमंडळातील एकाच गटाचे दोन मंत्री भ्रष्टाचार आणि गुंडगिरीमुळे गेले, ही या सरकारला लागलेली मोठी काळीमा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिंदे गटात अशा प्रकारचे अनेक मंत्री असून त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे, पैशांच्या बॅगा दिसत आहेत आणि अनेक गंभीर विषय आहेत, असं म्हणत फडणवीस टप्प्याटप्प्याने डाव टाकत शेवटी शिंदे गटावरच वार करतील, असा दावा राऊतांनी केला.
माणिकराव कोकाटे प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी सरकारवर थेट भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्याचा आरोप केला. कोकाटेंना शेवटपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत, आम्ही भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतो आणि त्यांना संरक्षण देतो हा संदेश सरकार देत असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे भ्रष्ट आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी आमच्या पक्षात यावं, त्यांना पूर्ण संरक्षण मिळेल, असाच हा संदेश असल्याचा आरोप त्यांनी केला. जर असं नसतं, तर अमित शाह यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली नसती, असं सांगत या भेटीतूनही "काही करा आणि आमच्याकडे या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत" हाच संदेश दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हा संदेश महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस देत आहेत, तर दिल्लीत अमित शाह देत असल्याचंही राऊत म्हणाले.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही संजय राऊत यांनी महत्त्वाची वक्तव्य केली. अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी असल्याचं आम्ही मानतो, असं स्पष्ट करत अजित पवार हे भाजपचे हस्तक असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील रणनीतीसाठी आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं सांगत, राज ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू असून काँग्रेसकडूनही संदेश आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधुंचाच होणार असून तो अस्सल मराठी माणूसच असेल, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.


COMMENTS