प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर शाश्वत विकासासाठी युवकांची भूमिका अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
शाश्वत विकासासाठी युवकांची भूमिका अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे,श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर आयोजित 'शाश्वत विकासासाठी युवक:पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन' या उपक्रमा अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर गुरुवार दि.18 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2025 या दरम्यान मु.पो.तेजेवाडी ता.जुन्नर या गावात नुकतेच यशस्वीरित्या पार पडले.
शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी व कार्यालय प्रबंधक सौ.मनिषा कोरे यांच्या उपस्थितीत संस्थेचे विश्वस्थ श्री अनिल जोगळेकर यांच्या हस्ते पार पडला. समाज सेवा व राष्ट्र सेवा राष्ट्रीय सेवा योजनेचा अविभाज्य भाग असल्याचे या प्रसंगी उदबोधन जोगळेकर यांनी केले.उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे यांनी भूषविले. या वेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा वसा आणि वारसा प्राचार्यांनी सांगितला. सदर कार्यक्रमात तेजवाडी गावचे सरपंच श्री.संपत नायकोडी, उपसरपंच श्री.राजेश विश्वासराव,गावातील विविध संस्थांचे पदधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.महेंद्र कोरडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिबिरात विविध व्याख्यानमाला, लाठीकाठी प्रशिक्षण, बौद्धिक खेळ,गटचर्चा, योगा,सूर्यनमस्कार व प्राणायाम यांसारखे अनेक उपक्रम घेण्यात आले.शिबिरास विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.व्याख्यानमालेत सायबर सुरक्षा व जनजागृती शाश्वत, विकासासाठी युवक,भारतीय संविधान व माझी जबाबदारी, सामाजिक जडणघडणीत युवकांची भूमिका, पाणलोट विकास व पडीक जमीन व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिर श्रमसंस्कार दरम्यान स्वयंसेवकांकडून तीन कि.मी. गावातील प्रमुख रस्त्याच्या दुतर्फा 240 चिंच, शंकासुर व बकुळ या झाडांची लागवड करण्यात आली. तसेच गावातील गायरान जमिनीवर एकूण 1075 फूट लांब समतल चर खोदण्यात आले. ओढ्याचे पाणी अडवण्यासाठी नाला खोलीकरण, दगड-मातीत १ भक्कम बंधारा तर एका गॅबीयन बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात आली. एकूण अंदाजे १४ लाख रुपयाचे काम स्वयंसेवकांनी केल्याचे उद्दगार ग्रामस्थांनी केले.
शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.निवृत्तीशेठ मुरलीधर काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक करताना शाश्वत विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार धर्मेंद्र कोरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सुधाकर घोडेकर लिखित "ग्रीष्म आणि वसंत" या पुस्तकाचे सर्व स्वयंसेवकांना वाटप केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे होते तर अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी, कार्यालय प्रबंधक सौ.मनीषा कोरे तसेच सरपंच,उपसरपंच प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील पदधिकारी,ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते. ग्रामस्थांनी आपल्या भाषणात बोलताना स्वयंसेवकांनी केलेले काम हे चांगले,समाधानकारक व गावउपयोगी असल्याचे सांगितले. शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ महादेव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ.महेंद्र कोरडे, डॉ.सुप्रिया काळे, प्रा.विष्णू घोडे,प्रा.जयश्री कणसे, प्रा.मयूर चव्हाण यांनी केले. या शिबिरासाठी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे यांनी शुभेच्छा दिल्या, तर अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.महेंद्र कोरडे, सूत्रसंचालन कु.अनघा ताजणे तर आभार प्रा.जयश्री कणसे यांनी केले.


COMMENTS