पुणे: पुणे शहरात एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचवण्याऐवजी त्यांना मरणाच्या दारात सोडून पळ काढणाऱ्या रिक्षाचालकाचा बाणेर पोलिसांनी थेट दिल्ली...
पुणे: पुणे शहरात एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचवण्याऐवजी त्यांना मरणाच्या दारात सोडून पळ काढणाऱ्या रिक्षाचालकाचा बाणेर पोलिसांनी थेट दिल्लीत जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. इसाराईल मंगला गुर्जर (वय २२, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या क्रूर कृत्यामुळे जखमी ज्येष्ठाला वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
बालेवाडी फाटा येथे २० जुलै रोजी रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला इसाराईलच्या रिक्षाने जोरदार धडक दिली. अपघात होताच स्थानिक लोक जमा झाले. यावेळी पोलिसांनी पकडू नये म्हणून इसाराईलने ‘मी यांना दवाखान्यात नेतो’ अशी बतावणी केली आणि त्यांना रिक्षात बसवून तिथून निघून गेला.
पण, रुग्णालयात नेण्याऐवजी आरोपीने रिक्षा खडकीतील रेंजहिल्स परिसरातील रेल्वे मार्गाजवळ नेली. तिथे असलेल्या दाट झाडीत गंभीर जखमी ज्येष्ठ व्यक्तीला टाकून तो पसार झाला होता. वडील घरी न परतल्याने मुलाने बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह रेल्वे रुळांजवळ सापडला होता.
पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासावरून रिक्षाचालकाची माहिती मिळाली. आरोपी इसाराईल हा दिल्लीतील महिपालपूर भागात लपून बसल्याची माहिती मिळताच बाणेर पोलिसांचे पथक तिथे रवाना झाले. तब्बल आठ दिवस दिल्लीत तळ ठोकून पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पुण्यातील अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुणे पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.


COMMENTS