मुंबई : मुंबईच्या डोंगरी परिसरात फुटपाथवरच गरोदर असलेल्या महिलेला प्रसुतीच्या कळा येत होत्या. त्यावेळी स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देत...
मुंबई : मुंबईच्या डोंगरी परिसरात फुटपाथवरच गरोदर असलेल्या महिलेला प्रसुतीच्या कळा येत होत्या. त्यावेळी स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देताच, डोंगरी महिला पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
महिला पोलिसांनी स्थानिकाच्या मदतीने महिलेला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र रस्त्यातच महिलेची प्रसुती झाली. त्यावेळी उपस्थित महिलांच्या मदतीने महिला पोलिसांनी बाळ आणि आईला तात्काळ जे जे रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी करून आई व बाळ दोघेही सुखरूप असल्याचे स्पष्ट केले. या घटनेनंतर मुंबई पोलिसांकडून एक्स पोस्ट करत महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
डोंगरी परिसरातून चालत जात असतानाच अचानकपणे गर्भवती महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि ती फुटपाथवर बसली. वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेबाबत समजताच डोंगरी पोलिस त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी जवळच्या रुग्णालयात नेण्याची हालचाल सुरू असतानाच वेदना आणखी वाढल्या आणि महिलेची प्रसूती झाली. पोलिसांनी स्थानिक महिलांच्या मदतीने वस्त्र घेऊन या ठिकाणी आडोसा निर्माण केला. ताबडतोब दोघांना वस्त्रामध्ये अलगद गुंडाळून जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी बाळाची नाळ कापली. बाळ, बाळंतीण सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
धारावी येथे वास्तव्यास असलेली माला नाडर (वय ३६) ही गर्भवती महिला पतीसोबत शनिवारी डोंगरी परिसरातून चालली होती. अचानक पोटात दुखू लागल्याने फुटपाथवर बसली, तिला चालताही येईना. स्थानिकांनी वेदनेने विव्हळत असलेल्या महिलेला पाहून डोंगरी पोलिसांना कळविले. डोंगरी पोलिसांच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. प्रसूती वेदना वाढत असल्याने चालता येत नसल्याचे माला आणि तिच्या पतीने सांगितले. पोलिस कॉन्स्टेबल खडसे यांनी चादर तसेच इतर वस्त्रांची व्यवस्था केली. महिला पोलिस कॉन्स्टेबलनी चारही बाजूने आडोसा केला. याचदरम्यान गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला.
महिला पोलिसांनी माला यांना बाळासह कपड्यात लपेटले. स्थानिक महिलांच्या मदतीने पोलिसांनी बाळ आणि बाळंतिणीला अलगद गाडीमध्ये ठेवले आणि जवळच्या जे. जे. रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्वरीत उपचाराला सुरूवात केली. बाळाची नाळ कापून बाळाला मातेपासून वेगळे केले. पोलिसांनी वेळ न घालवता माला आणि तिच्या मुलास रुग्णालयात नेल्याने त्यांना वेळीच योग्य ते उपचार मिळाले. दोघेही सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर सर्वांनी आंनद व्यक्त केला.


COMMENTS