सातारा : थर्टी फर्स्टची पार्टी जल्लोषात सुरु असतानाच साताऱ्यात एका युवकाला अंधाऱ्या वाटेत जाणे चांगलचं भोवलंय. 31 डिसेंबरच्या निमित्ताने ए...
सातारा : थर्टी फर्स्टची पार्टी जल्लोषात सुरु असतानाच साताऱ्यात एका युवकाला अंधाऱ्या वाटेत जाणे चांगलचं भोवलंय. 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक तरुण त्याच्या मित्रांसोबत कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता.
मात्र, तरुण हॉटेलच्या बाहेर येताच अंधाराचा अंदाज न आल्याने थेट चारशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून मध्यरात्री उशिरा छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने त्याला दरीतून बाहेर काढण्यात आले.
साताऱ्यातील कास पठार परिसर हा निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, काही ठिकाणी रस्त्यालगत खोल दऱ्या असून रात्रीच्या वेळी येथे विशेष काळजी घेणे आवश्यक असते. 31 डिसेंबरच्या रात्री क्षेत्रमाहुली येथील आदित्य कांबळे हा तरुण मित्रांसोबत कास पठाराच्या दिशेने असलेल्या एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता. पार्टी आटोपल्यानंतर आदित्य हॉटेलच्या बाहेर आला. परिसरात पुरेसा प्रकाश नसल्याने आणि दरीचा अंदाज न आल्याने त्याचा तोल गेला आणि तो थेट सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळला.
तरुण दरीत पडल्याची माहिती मित्रांना मिळताच एकच गोंधळ उडाला. तातडीने स्थानिक नागरिकांसह छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स या आपत्ती व्यवस्थापन व ट्रेकिंगमध्ये कार्यरत असलेल्या संस्थेला याची माहिती देण्यात आली. रात्रीची वेळ, अंधार आणि खोल दरी यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण होते. मात्र, माहिती मिळताच ट्रेकर्सचे कार्यकर्ते आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
मोठ्या धैर्याने आणि कौशल्याने ट्रेकर्सच्या पथकाने दोरखंड, टॉर्च आणि इतर साधनांच्या मदतीने दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर जखमी अवस्थेत आदित्य कांबळे आढळून आला. त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक त्याला प्राथमिक मदत देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या थरारक बचाव मोहिमेनंतर तरुणाला सुरक्षितरीत्या दरीतून वर काढण्यात यश आले. जखमी अवस्थेत असलेल्या आदित्य कांबळेला तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नववर्षाच्या आनंदावर पाणी फेरले गेले आहे.
दरम्यान, अशा निसर्गरम्य पण धोकादायक ठिकाणी रात्रीच्या वेळी फिरताना आणि पार्टीनंतर बाहेर पडताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच, वेळेवर माहिती मिळाल्याने आणि छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या तत्परतेमुळे तरुणाचे प्राण वाचल्याने सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.


COMMENTS