पुणे: सिंहगड पायथ्याशी असलेल्या खानापूर (ता. हवेली) परिसरात शुक्रवारी भरदिवसा पडलेल्या दरोड्याने खळबळ उडाली आहे. पानशेत रस्त्यावरील 'वैष...
पुणे: सिंहगड पायथ्याशी असलेल्या खानापूर (ता. हवेली) परिसरात शुक्रवारी भरदिवसा पडलेल्या दरोड्याने खळबळ उडाली आहे. पानशेत रस्त्यावरील 'वैष्णवी ज्वेलर्स' या दुकानावर पाच सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला चढवला.
चोरट्यांनी अवघ्या दोन मिनिटांत सुमारे एक कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. संबंधित घटना सीसीटीव्हित कैद झाली आहे.
‘वैष्णवी ज्वेलर्स’ या दुकानाचे मालक श्री. बाबर, त्यांचा आजारी मुलगा आणि दोन महिला कर्मचारी शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दुकानात उपस्थित होते. दोन दुचाकींवरून पाच जण तिथे पोहोचले. या सर्वांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. दुकानात शिरताच दरोडेखोरांनी धारदार कोयते उपसले आणि उपस्थित सर्वांना ठार मारण्याची धमकी दिली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रेकी करून आलेल्या या टोळीने काचेच्या कपाटातील सुमारे ७५ ते ८० तोळे सोन्याचे दागिने अवघ्या दीड ते दोन मिनिटांत पिशव्यांमध्ये भरले आणि पानशेतच्या दिशेने वेगाने पसार झाले.
घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये पाच चोर दुकानात शिरताना दिसतात. अतिशय वेगात त्यातील काहीजण दुकानातील सोन्याचे दागिने पिशवीत भरायला सुरूवात करतात. तर एकजण मालक आणि दुकानातील कामगारांना हातातील हत्यार दाखवून धमकावताना दिसत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. दरोडेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या मार्गाचा तपास सुरू आहे.


COMMENTS