पुणे: खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीवर भाविक व कार्यकर्त्यांनी भंडारा अर्पण करताना अचानक भीषण भडका उडून किमान 16 जण गंभीर भाजल्याची घटना घडल...
पुणे: खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीवर भाविक व कार्यकर्त्यांनी भंडारा अर्पण करताना अचानक भीषण भडका उडून किमान 16 जण गंभीर भाजल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये दोन नव्याने निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांसह अनेक महिला, तरुणांचा समावेश आहे.
भंडाऱ्याने पेट घेतला आणि जोरदार आवाजासह स्फोट होऊन आजूबाजूचे लोक होरपळले. भाजलेल्या जखमींना तातडीने जेजुरीतील खाजगी तसेच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मल्हार नाट्यगृहात मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार, समर्थक व कार्यकर्ते खंडोबाच्या दर्शनासाठी गडाच्या पहिल्या पायरीवर गेले होते. येथे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळताना वापरलेल्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला. अत्यंत ज्वालाग्राही घटक मिश्रित असल्यामुळे भडका एकदम मोठा झाला आणि अनेक जण त्यात सापडले. स्फोटासारखा आवाज झाल्यानंतर क्षणात परिसर धुराने व्यापला. काही काळासाठी तिथे प्रचंड घबराट पसरली होती.
एका प्रत्यक्षदर्शीभंडारा विक्रेत्याने सांगितले की, निवडणुकीत निवडून आलेले लोक आरती करत असताना खाली कापूर लावला होता आणि वरून भंडारा उधळला जात होता. याच वेळी जोरदार भडका होऊन पळापळ झाली आणि अनेक जण भाजले गेले. जेजुरी देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले की, गेले अनेक वर्षांपासून ते पत्रकारितेच्या माध्यमातून भेसळयुक्त भंडारा आणि कुंकू याबद्दल आवाज उठवत आहेत. २०११-१२ च्या दरम्यान, त्यांनी आणि इतर विश्वस्तांनी पुणे येथील औंध विभागातील अन्न व औषध भेसळ प्रशासनाकडे भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत नमुने तपासण्यास सांगितले होते. मात्र, त्या अहवालानुसार कोणतीही पुढील कारवाई झाली नाही.


COMMENTS