पुणे: पुणे शहरातील कोंढवा भागात रिक्षाचालक गणेश काळे याची हत्या करण्यात आली. परंतु, प्रयत्न त्याच्या मारेकऱ्यांनी सहा महिन्यांआधी देखील प्...
पुणे: पुणे शहरातील कोंढवा भागात रिक्षाचालक गणेश काळे याची हत्या करण्यात आली. परंतु, प्रयत्न त्याच्या मारेकऱ्यांनी सहा महिन्यांआधी देखील प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिस चौकशीतून समोर आली आहे.
त्यासाठी पुण्यातील आंबेगाव भागात सापळा देखील लावण्यात आला होता. मात्र गणेश काळे तेव्हा त्या भागात न आल्याने तो प्रयत्न फसला होता.
गणेश काळे याची रिक्षा जिथे-जिथे जाईल तिथे-तिथे त्याचा पाठलाग होत होता. शनिवारी पुन्हा मारेकरी सकाळपासून त्याच्या मागावर होते. अखेर येवलेवाडीतील पेट्रोल पंपासमोर गणेश काळे याची हत्या करण्यात आली. आंदेकर टोळीने गणेश काळे याच्या खुनासाठी गेल्या सहा महिन्यांपूर्वीपासून फिल्डींग लावली होती. मात्र, आंबेगाव पठार परिसरात सोमनाथ गायकवाड याच्या घराच्या रेकीचा प्रकार समोर आल्यानंतर नियोजन फसले होते. अखेर शनिवारी (दि.१) दुपारी अमन शेख, अरबाज पटेल आणि त्याच्या साथीदारांनी गणेश काळे याची हत्या केली. त्यासाठी शनिवारी सकाळी आठ वाजेपासून गणेश काळे याच्यावर पाळत ठेवली होती. त्यानंतर दुपारी चार वाजता संधी मिळताच त्याच्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी याप्रकरणी सांगितले की, शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गणेश काळे हा रिक्षा घेऊन खडी मशीन चौकाच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी दोन दुचाकीवरून काही जण त्याचा पाठलाग करत आले. चौघांनी जवळून गणेश काळेवर गोळ्या झाडल्या. चार राऊंड फायर करण्यात आले. गणेश काळे जखमी झाल्यानंतर त्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने दोन वार करण्यात आले. यात कोयत्याच्या हल्ल्याने त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. गणेश हा येवलेवाडीत राहत होता. तो खडीमशीन चौकाकडे येत होता. पेट्रोलपंपाजवळ गणेशची रिक्षा अडवली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याला काहीच करता आले नाही. गणेश काळेला चार गोळ्या लागल्या. मानेत, छातीत व पोटात गोळ्या घुसल्या. त्यावंतर तो तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तो खाली कोसळल्यानंतर दोन हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले.
दरम्यान, गणेश काळे खूनप्रकरणी आंदेकर टोळीवर आणखी एक मकोका लावण्यात येणार आहे. या टोळीवर अगोदरच तीन मकोका आहेत अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. गणेश काळे हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपी समीर काळे, याचा भाऊ आहे. याच समीर याने वनराजच्या खुनात वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली होती. तर तो प्रत्यक्ष वनराज यांचा खून करताना तिथे उपस्थित होता. त्याने देखील वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या; परंतु त्याच्याकडून मिस फायर झाले होते. त्यामुळे तो आंदेकर टोळीच्या रडारवर आला होता. अखेर टोळीने त्याचा भाऊ गणेश काळेला रस्त्यात गाठलं आणि वनराज आंदेकरांच्या हत्येचा सेम पॅटर्न वापरून खून केला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर, अमीर खान, अमन शेख अरवाज पटेल, मयूर वाघमारे यांच्यासह नऊ जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


COMMENTS