पुणे: एका आयटी अभियंत्याला त्याच्या दोन्ही मुलींना बरं करण्याच्या आमिषाने तब्बल १४ कोटी रुपयांना भोंदू बाबाने गंडा घातल्याचा धक्कादायक प्र...
पुणे: एका आयटी अभियंत्याला त्याच्या दोन्ही मुलींना बरं करण्याच्या आमिषाने तब्बल १४ कोटी रुपयांना भोंदू बाबाने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार विद्येच्या माहेरघरात उघडकीस आला आहे. कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीमुळे खळबळ उडाली आहे.
महिला मांत्रिक वेदिका पंढरपुरकर आणि तिचा नवरा कुणाल पंढरपुरकर यांनी डोळस कुटुंबाची 14 कोटींना फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. त्यानंतर कोथरुडच्या महात्मा सोसायटीतील बंगल्यात असणारी वेदिका आणि तिचा पती कुणाल त्यांच्या बंगल्यातून गायब झाले आहेत. वेदिकाने दिपक डोळस यांच्याकडून उकळलेल्या पैशांमधून कोथरुड भागातील महात्मा सोसायटीत कैलासदीप नावाचा अलिशान बंगला खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे.
शंकर महाराज त्यांच्या अंगात येतात आणि ते कोणताही आजार बरा करू शकतात, असा दावा करून या भोंदू बाबाने पीडित दांपत्याची दिशाभूल केली आहे. फसवणूक झालेल्या आयटी अभियंत्याची पत्नी शिक्षिका आहे. या दाम्पत्याची कोट्यावधींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येताच खळबळ उडाली आहे. या दांपत्याने आपल्या आयुष्यभराची बचत आणि इंग्लंडमधील घर, फार्म हाऊस देखील गमावले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव दिपक खडके असून, त्याला त्याची शिष्या वेदिका पंढरपुरकर हिने फसवणुकीत साथ दिल्याचे समोर आले आहे.
पीडित दीपक काही वर्ष इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यांच्या दोन मुली या नेहमी आजारी असायच्या. त्यामुळे दीपक डोळस चिंतेत असायचे. दरम्यानच्या काळात त्यांची ओळख राजेंद्र उर्फ दीपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपूरकर हिच्याशी झाली. या दोघांनी ‘शंकर महाराज’ त्यांच्या अंगात येतात आणि ते दुर्धर आजार बरे करतात असा दावा केला. विश्वास बसावा म्हणून वेदिका पंढरपुरकरने स्वतःच्या अंगात ‘शंकर महाराज’ आले आहेत असा खोटा आव आणला. त्यानंतर त्यांनी डोळस कुटुंबाला सांगितले की, तुमचे धन आम्ही जपून ठेवल्यास आणि पूजा केल्यास तुमच्या दोन्ही मुली बऱ्या होतील. याच बहाण्याने या भोंदू जोडीने डोळस दाम्पत्याकडून बँकेतील सर्व ठेवी आणि बचत निधी त्यांच्या खात्यात ऑनलाइन वळवून घेतला. शिवाय, इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकून त्याचे पैसेही वेदिका पंढरपुरकरच्या खात्यात वळवून घेतले.
पीडित यांच्या मुली बऱ्या न झाल्याने त्यांनी खडके आणि पंढरपुरकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तुमच्या घरात दोष असल्याचे सांगितलं. डोळस हे काही वर्ष इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यामुळे त्यांचं इंग्लंडमध्ये देखील घर होतं आणि फार्महाऊस खरेदी केले होते. ते इंग्लंडमधील घर आणि फार्म हाऊस त्यांना विकायला लावण्यात आलं आणि ते पैसे पंढरपुरकर यांच्या खात्यात वळते करण्यात आले. त्यानंतर डोळस यांना त्यांचा पुण्यातील प्लॉट आणि फ्लॅट विकण्यास सांगण्यात आले आणि ते पैसे देखील हडप केले.


COMMENTS