फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात (Phaltan Doctor Suicide) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी अत्यंत आक्...
फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात (Phaltan Doctor Suicide) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मृत महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तिचे चारित्र्यहनन केल्याचा गंभीर आरोप अंधारेंनी केला.
मृत डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी अंधारे यांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. यावेळी एसपी तुषार दोशी भेटले नाहीत म्हणून त्या पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या मांडून बसल्या. डीवायएसपी खांबे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी तपास पद्धतीवर जोरदार टीका केली. तपासाची माहिती जाहीर करता येत नसेल, तर रुपाली चाकणकर यांनी मृत महिलेचे चॅट कसे जाहीर केले आणि त्यावेळी बाजूला बसलेल्या तुषार दोशींनी त्यांना का अडवले नाही? असा सवाल करत अंधारेंनी दोशींवर 'ठरवून चारित्र्यहनन' केल्याचा आरोप केला. 'फलटण पोलीस ठाणे छळछावणी झाली आहे. अश्विनी बिद्रे प्रकरणात आणि अंतरवाली सराटीतही तुषार दोशींनी जे केले, त्यामुळे त्यांच्या तपासावर आमचा विश्वास नाही,' असे अंधारे म्हणाल्या.
या प्रकरणात मृत महिलेचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करणारे मंत्री जयकुमार गोरे आणि रुपाली चाकणकर यांच्यावरही सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली. 'जयकुमार गोरे हे त्या महिलेचे चारित्र्य ठरवणारे कोण? त्यांनी आधी स्वतःच्या चारित्र्याकडे बघावे. चाकणकर बाई चारित्र्य ठरवणार का? त्यांनी आधी स्वतःचे तपासावे,' अशा शब्दांत अंधारेंनी टोला लगावला. तपास अधिकारी ज्या गोष्टी बोलू शकत नाहीत, त्या चाकणकर कशा काय बोलू शकतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
प्रकरणात ज्यांची नावे आली आहेत, त्या सहा लोकांची चौकशी व्हावी, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. डीवायएसपी राहुल धस, एपीआय जायपात्रे, माजी खासदारांचे दोन पीए शिंदे आणि नागटिळक, पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि मेडिकल अधिकारी अंशुमन धुमाळ ही या सहा जणांची नावे आहेत. या सहा जणांवर आरोपपत्र दाखल का झाले नाही? पोलीस विभाग त्यांना वाचवत आहे का? असा प्रश्न करत अंधारेंनी आरोपपत्रात या लोकांची नावे नसल्यास पीडितेच्या कुटुंबाच्या जबाबांना अर्थ नाही, असे म्हटले आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली नेमलेली यंत्रणा ही एसआयटी नसून केवळ 'गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीसाठीची नियुक्ती' असल्याचा दावा अंधारेंनी केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. हा लढा कोणत्याही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे एका व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात (Phaltan Doctor Suicide) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मृत महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तिचे चारित्र्यहनन केल्याचा गंभीर आरोप अंधारेंनी केला.


COMMENTS