सांगली: सांगली शहरातील गारपीर चौक परिसरात मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एका राजकीय नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरानं...
सांगली: सांगली शहरातील गारपीर चौक परिसरात मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एका राजकीय नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरानं राजकीय नेत्याला मुळशी पॅटर्न स्टाईलने संपवले आहे.
वाढदिवसाच्या पार्टीत जेवण केल्यानंतर स्टेजवर जाऊन राजकीय नेत्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. राजकीय नेत्याचा काही क्षणात मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
उत्तम जिनाप्पा मोहिते (वय ४१, रा. गारपीर चौक, सांगली) असे हत्या झालेल्या राजकीय नेत्याचे नाव आहे. ते दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सांगली जिल्ह्यात कार्यरत होते. ते अनेक हटके आंदोलनांसाठी प्रसिद्ध होते. मंगळवारी त्यांचा वाढदिवस होता, त्या निमित्ताने गारपीर चौक येथील घरासमोर स्टेज उभारून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवारी (ता. ११) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख हा त्याच्या काही साथीदारांसह या कार्यक्रमाच्या ठिकाणी आला. त्याने जेवणाचा आस्वादही घेतला. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने हे टोळके उत्तम मोहिते यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ असलेल्या धारदार हत्याराने उत्तम मोहिते यांच्या पोटात व मानेवर सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि मोहिते गट व संशयित टोळक्यामध्ये मोठी धुमश्चक्री झाली. गंभीर जखमी अवस्थेत उत्तम मोहिते यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, संतप्त जमावाने खुनी हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित शाहरुख शेख याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावरही शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर सांगली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठा फौजफाटा रुग्णालय परिसरात दाखल झाला आहे.


COMMENTS