पिंपरीतून भोसरीकडे निघालेल्या पीएमपीएमएलच्या बसला रविवारी सकाळी ११.४० वाजता आग लागली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने यांत्रिक दर...
पिंपरीतून भोसरीकडे निघालेल्या पीएमपीएमएलच्या बसला रविवारी सकाळी ११.४० वाजता आग लागली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने यांत्रिक दरवाजे उघडले. यामुळे बसमधील १५ प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने सुखरूप बचावले.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पीएमपीएमएलची बस पिंपरीतून भोसरीच्या दिशेने निघाली. यावेळी बसमध्ये १५ प्रवासी, वाहक आणि चालक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचा थांबा घेतल्यानंतर बस नेहरूनगरच्या दिशेने रवाना झाली.
प्रवाशांना बसमधून खाली उतरला
बस लोखंडे कामगार भवनासमोर आल्यावर बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. या बसला यात्रिक दरवाजे असल्याने सर्व प्रवासी बसमध्ये अडकले असते. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बसचे दरवाजे उघडले आणि त्यानंतर प्रवाशांना धोक्याची सूचना देत स्वतःही बसमधून खाली उतरला.
चालक उतरल्यानंतर बसने पेट घेतला. चालक, वाहक आणि नागरिकांनी जवळच असलेल्या एका हॉटेलमधून अग्निरोधक यंत्र आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र अल्पावधीतच आगीने रौद्ररूप धारण केले. चालकाने ही बाब अग्निशामक दलास कळविली. त्यानुसार अग्निशामक मुख्यालयातून एक बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यत संपूर्ण बसने पेट घेतला होता. शर्तीच्या प्रयत्नानंतर अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती.
बसला लागलेली ही आग बघण्यासाठी आसपासच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच आगीमुळे वाहनांना जात येत नसल्याने मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. पेटलेल्या बसच्या समोरच वाहतूक पोलीस चौकी होती. त्यांनी ही वाहतूक कोंडी दूर केली.


COMMENTS