पुणे शहरातील अतिशय वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या तिघांवर आरोपींनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात एक युवक गंभीर ज...
पुणे शहरातील अतिशय वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या तिघांवर आरोपींनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरातील गजबजलेल्या बाजीराव रस्त्यावरून तीन जण दुचाकीवरून जात होते. मागून दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यांच्या हल्ल्यात मयंक खराडे अतिशय गंभीर जखमी झाला. मयंक रक्ताच्या थारोळ्यात पडला. दुचाकीवरील दुसरा तरुणही जखमी झाला आहे. मयंक खराडे याची परिस्थिती चिंताजनक आहे. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या दुसऱ्या युवकाचे नाव अभिजीत इंगळे असे आहे.
बाजीराव रस्त्यावरील घटना कळताच पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. पुणे शहरात नव्याने उदयास आलेल्या माया टोळीतील सदस्यांनी बाजीराव रस्त्यावर रक्तरंजित थरार घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे. टोळीचा म्होरक्या अभिजीत पाटील याने हे कृत्य केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अभिजीत पाटील याला गुन्हेगारी वर्तुळात ‘माया’ या नावाने संबोधतात. माया टोळीत अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे हे सदस्य आहेत. अमन आणि अक्षय हे दोघेही बाजीराव रस्त्यावरील हल्ला प्रकरणात आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर आहेत.
अभिजीत पाटील हा माया टोळीचा म्होरक्या असून, त्याला पुणे शहरातून तडीपार करण्यात आले आहे. पुण्यातील पर्वती पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या नावावर गंभीर मारहाण, हत्येचा प्रयत्न, खंडणी आदी गुन्हे दाखल आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS