राज्यात बेरोजगारीमुळे तसेच शेती करणाऱ्या तरुणासोबत मुली लग्नास तयार नसल्याचे भीषण चित्र कायम राहिले आहे. यामुळे तरुण वर्गात अविवाहीत राहण्या...
राज्यात बेरोजगारीमुळे तसेच शेती करणाऱ्या तरुणासोबत मुली लग्नास तयार नसल्याचे भीषण चित्र कायम राहिले आहे. यामुळे तरुण वर्गात अविवाहीत राहण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे.
अशातच, राज्यात सध्या एका तरुणाचे पत्र व्हायरल झाले असून लग्नासाठी तरुणाने थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना साकडे घातले आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार अकोला दौऱ्यावर होते. यावेळी पवारांना एका तरुणाने निवेदन वजा पत्र दिले. या निवेदनात 'माझे लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या. मी तुमचे उपकार विसरणार नाही', अशी साद पत्राद्वारे घातली आहे. या पत्राची जोरदार चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहे.
तरुणाच्या पत्रात नेमकी व्यथा काय?
आपलं वय वाढत आहे, भविष्यात लग्न होणार नाही आणि आपण एकटेच राहू, या भीतीने त्रस्त झालेल्या अकोल्यातील तरुणाने पत्रात स्वतःचा पत्ता आणि मोबाइल नंबर देत, "माझे वय वाढतेय, भविष्यात माझे लग्न होणार नाही, मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी." अशी विनंती तरुणाने पवारांना केली आहे.
तसेच, मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. "मी तिच्या घरी राहायलाही तयार आहे. तिथे चांगलं काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी देतो," मला जीवनदान द्यावं, मी तुमचे उपकार विसरणार नाही. असही तरुणाने पत्रात म्हटले आहे.


COMMENTS