पुणे : पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील तब्बल 40 एकर भूखंड प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंढवा व बोपोडी येथ...
पुणे : पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील तब्बल 40 एकर भूखंड प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंढवा व बोपोडी येथील जमीन घोटाळ्यांची "मास्टरमाईंड" शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पुणे पोलिसांकडून सध्या तिचा शोध सुरू आहे.
शीतल तेजवानी हिच्या विरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, तिचा मोबाईल फोन बंद आहे. तसेच ती तिच्या राहत्या पत्त्यावर आढळून आलेली नाही. ती नवऱ्यासह देशाबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. बावधन पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू केली आहे, जेणेकरून तिचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का? हे याबाबत माहिती मिळणार आहे.
दरम्यान, या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील हे दोघे भागीदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही जमीन व्यवहार "अमेडिया कंपनी" (Amedia Pvt. Ltd.) मार्फत करण्यात आली असून, या कंपनीत पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे प्रमुख भागीदार आहेत. या व्यवहारात गंभीर गैरव्यवहार आणि शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सहजिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, जमीन विक्रेती शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, तसेच सह-दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादस दानवे यांनी केला. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला असे अंबादास दानवे म्हणाले. यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, संबंधित व्यवहार रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


COMMENTS