नाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरीजवळील पेट्रोलपंपासमोर गुरुवारी (ता. २७) दुपारी आलेल्या विचित्र अपघातात कंटेनरखाली चिरडून दुचाक...
नाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरीजवळील पेट्रोलपंपासमोर गुरुवारी (ता. २७) दुपारी आलेल्या विचित्र अपघातात कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली. स्वाती संतोष बेल्हेकर (वय ४५, रा. त्र्यंबकेश्वर) असे मृत महिलेचे नाव होते.
स्वाती बेल्हेकर या गुरुवारी दुपारी दुचाकीवरून (एमएच १५, केडी केडी ९३७२) त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे निघाल्या होत्या. पपया नर्सरी परिसरात दुचाकी घसरल्याने त्या रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या कंटेनरचे (जीजे ०६, बीटी ०२७१) मागील चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी बेदरकार कंटेनर चालकांविरोधात कठोर कारवाई करण्याची, तसेच या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.
स्वाती बेल्हेकर या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होत्या. करोना काळात त्यांच्या पतीचे निधन झालेले असून, चार मुलींचे विवाह झाले आहेत. एकुलता मुलगा वर्षभरापूर्वीच लष्करात ‘अग्निवीर’ म्हणून भरती झालेला आहे. सध्या त्या एकट्याच त्र्यंबकेश्वर येथे वास्तव्यास होत्या. बहीण-भावंडांवरील पित्यापाठोपाठ मातेचेही छत्र हरपल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS