पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातील कासेवाडी परिसरात तब्बल 32 वर्षे बेकायदेशीर दवाखाना चालवणाऱ्या तोतया डॉक्टरला ...
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातील कासेवाडी परिसरात तब्बल 32 वर्षे बेकायदेशीर दवाखाना चालवणाऱ्या तोतया डॉक्टरला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैद्यकीय शिक्षणाची कोणतीही माहिती आणि अभ्यास नसतानाही तो रुग्णांवर उपचार करत होता.
प्रमोद राजाराम गुंडू (वय 57) असे तोतया डॉक्टराचे नाव आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कारवाई मोहीम राबवताना या खोट्या डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे. कासेवाडी भागात दवाखाना चालवणाऱ्या गुंडूबद्दल माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकला. गुंडूकडे कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा नोंदणी नसताना तो रुग्णांना औषधं, इंजेक्शन देत होता आणि उपचार करत होता.
आरोग्य विभागाने मे महिन्यात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. मात्र गुंडू त्यानंतर फरार झाला होता. तीन दशकांपासून लोकांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा तोतया डॉक्टर अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय दोन्हीकडे जात होता, पण न्यायालयांनी त्याचे सर्व अर्ज फेटाळले. तरीही तो लपून बसला होता. शेवटी खडक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जयसिंग दाढे आणि त्यांच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
न्यायालयाने पोलिस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून त्याच्या दवाखान्याशी संबंधित कागदपत्रांची, औषधांच्या नोंदींची आणि बेकायदेशीर उपचारांच्या पुराव्यांची सखोल चौकशी सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS