नांदेड: प्रेमसंबंधातून एका युवकाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना कांडली (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे उ...
नांदेड: प्रेमसंबंधातून एका युवकाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना कांडली (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे उघडकीस आली आहे. नकुल संजय पावडे (रा. कांडली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुलीचे वडील आणि भावानेच या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
कांडली येथील नकुल पावडे हा २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून घरातून बेपत्ता झाला होता. नकुलचे वडील संजय पावडे यांनी दोन दिवस (२६ व २७ ऑक्टोबर) त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेही सापडला नाही. अखेर त्यांनी २७ ऑक्टोबर रोजी तामसा पोलिस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर तामसा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने नकुलचा शोध सुरू केला. तपासादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांनी गणेश दारेवाड (वय ४०) आणि विशाल दारेवाड (वय १९) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी केली असता दोघांनी हत्येची कबुली दिली. गणेश दारेवाड हा मुलीचा वडील तर विशाल दारेवाड हा तिचा भाऊ आहे.
तपासादरम्यान आरोपींनी सांगितले की, “प्रेमसंबंधातून आम्हीच नकुल पावडे याचा खून केला आणि त्याचा मृतदेह पोत्यात बांधून भोकर हद्दीतील सुधा नदीजवळ असलेल्या शिंगारवांडी शिवारातील विहिरीत फेकून दिला.” यानंतर तामसा पोलिस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी (ता. २८) रात्री विहिरीतून नकुल पावडे याचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी तामसा आरोग्य केंद्रात पाठवला आहे.
संजय शिवाजी पावडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश दारेवाड व विशाल दारेवाड या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बालाजी नरवटे हे करत आहेत. प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याने कांडलीसह तामसा परिसरात खळबळ उडाली आहे.


COMMENTS