चंदीगड (पंजाब): राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू तेजपाल सिंह यांची दिवसाढवळ्या छातीत गोळी मारून शुक्रवारी (ता. ३१) हत्या करण्यात आली आहे....
चंदीगड (पंजाब): राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू तेजपाल सिंह यांची दिवसाढवळ्या छातीत गोळी मारून शुक्रवारी (ता. ३१) हत्या करण्यात आली आहे. लुधियाना जिल्ह्यातील जगराओं शहरात एसएसपी कार्यालयापासून अवघ्या 250 मीटर अंतरावर असलेल्या हरि सिंह रोडवर घटना घडली.
जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
तेजपाल सिंह हे शुक्रवारी दुपारी सुमारे 2:50 वाजता त्यांच्या कारमध्ये जगराओं येथील पार्किंग क्षेत्रात उभे होते. त्याच वेळी दोन गाड्यांमधून सात ते आठ तरुण तिथे आले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, तेजपाल यांच्या कारचा हल्लेखोरांच्या एका गाडीला किरकोळ धक्का लागला, ज्यातून वादाची सुरुवात झाली. मात्र, या किरकोळ वादाचे रूपांतर हत्याकांडात झाले. हल्लेखोरांनी तेजपाल यांना घेरले आणि सुमारे 20 मिनिटे त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तेजपाल यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण हल्ला रोखता आला नाही. अखेरीस, जाताना एका आरोपीने आपली पिस्तुल काढली आणि तेजपाल यांच्या छातीत गोळी झाडली. गोळी लागताच तेजपाल जागेवर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
एसएसपी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपी असलेल्या दोन सख्ख्या भावांचे तेजपाल यांच्यासोबत जुने वैमनस्य होते आणि यापूर्वीही त्यांच्यात दोन ते तीन वेळा हाणामारी झाली होती. मात्र, यापैकी कोणत्याही भांडणाची तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचली नव्हती. हल्लेखोरांना त्वरित अटक करण्यासाठी पोलिसांनी पथकं स्थापन केली असून ठिकठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.


COMMENTS